वुहानमधील डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने सुंदर बाळाला जन्म दिला आहे. सर्वप्रथम ली वेनलियांग यांनीच करोना व्हायरसच्य़ा संकटाची जगाला कल्पना दिली होती. ली वेनलियांग यांनी करोना व्हायरसचे सत्य जगासमोर आणले. पण चीनमधल्या यंत्रणांनी त्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. ली वेनलियांग यांचा फेब्रुवारी महिन्यात करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.

आता त्यांच्या पत्नी फू शुजेई यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. फू शुजेई यांनी वीचॅट या इन्स्टंट मेसेंजिग अ‍ॅपवर मुलाचा गोंडस फोटो शेअर केला आहे. दिवंगत नवऱ्याकडून मिळालेली ही ‘अखेरची भेट’ असा संदेश लिहिला आहे.

ली वेनलियांग वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते. अफवा परसरवत असल्याच्या आरोपाखाली ली यांना चीनमध्ये अटक करण्यात आली होती. Covid-19 च्या देशातील खऱ्या परिस्थितीबद्दल ते सतर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत अल्पकाळात हा आजार जागतिक महामारी बनला.

३० डिसेंबर रोजी ली यांनी त्यांच्या सात मित्रांच्या वी चॅट ग्रुपवक सर्वप्रथम करोना व्हायरसच्या आजाराची माहिती दिली होती. सार्स सारखा हा आजार वाटत आहे असे त्यांनी म्हटले होते. २००२-०३ साली चीनमध्ये करोनासारखीच सार्सची साथ आली होती. त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. या आजाराबद्दल फक्त मित्रांना सतर्क करण्याचा आपला हेतू होता असे ली यांनी सांगितले. पण ती पोस्ट नंतर व्हायरल झाली.

तुरुंगातून सुटल्यानंतर ली यांनी पुन्हा रुग्णालयात जाऊन काम सुरु केले. पण तिथे एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना करोना व्हायरस झाला. १२ जानेवारी रोजी ली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. अखेर फेब्रुवारीमध्ये त्यांचा मृत्यू झाला.