नवी दिल्ली : ट्विटरने मंगळवारी अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे जाहीर केले असून या अधिकाऱ्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच थेट माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारने ट्विटरला नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यासाठी अखेरची संधी देत असल्याची नोटीस पाठविली होती. निकषांचे पालन न केल्यास या व्यासपीठाला दायित्वातून देण्यात आलेल्या सवलतीला मुकावे लागेल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आश्वासन ट्विटरने सरकारला दिले होते.

आता ट्विटरने अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून त्याबाबतचा तपशील लवकरच माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास देण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा कंपनी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

संसदीय समितीसमोर हजर राहण्याचा आदेश

दरम्यान, संसदेच्या समितीने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना १८ जून रोजी समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना बोलाविण्यात आले आहे.