जीएसटीमध्ये झालेले बदल गुजरात निवडणुकीशी जोडणे म्हणजे बालिश राजकारण असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.GST जीएसटीमध्ये करण्यात आलेले बदल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Gujarat Assembly Elections 2017 करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. विरोधकांच्या या टीकेला जेटलींनी ‘बालिश राजकारण’ म्हणत टोला लगावला आहे. यासोबतच जीएसटीमध्ये आणखी फेरबदल होतील, असे संकेतही त्यांनी दिले. सरकार महसुली उत्पन्नाचा आढावा घेऊन याबद्दलचे निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात जीएसटीच्या २८ टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या १७८ वस्तूंचा समावेश १८ टक्के स्लॅबमध्ये करण्यात आला. जीएसटीमध्ये करण्यात आलेले बदल गुजरात विधानसभा निवडणुकीतील मतांच्या राजकारणासाठी करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. शिवसेनेने तर ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’, अशा बोचऱ्या शब्दांमद्ये मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. विरोधकांच्या या टीकेचा जेटलींनी ‘बालिश राजकारण’ म्हणत समाचार घेतला. ‘जीएसटीमध्ये बदल करण्याची आवश्यकता होती. त्यामुळेच आम्ही ४ महिन्यांमध्ये २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये बदल केले आहेत,’ असे जेटलींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. १ जुलै रोजी जीएसटी लागू करण्यात आला. यानंतर त्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला जीएसटी परिषदेची बैठक होते.

‘भविष्यात महसुली उत्पन्नाचा आढावा घेऊन कराचे प्रमाण बदलण्याचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती अरुण जेटलींनी दिली. ‘आम्ही बाजारातील स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेत आहोत. जीएसटीमध्ये झालेल्या बदलांचा फायदा ग्राहकांना मिळावा, हा जीएसटी परिषदेचा हेतू आहे,’ असेही ते म्हणाले. गेल्या आठवड्यात शुक्रवारी जीएसटी परिषदेची गुवाहाटीध्ये बैठक झाली. यामध्ये २८ टक्के कर असलेल्या १७८ वस्तूंचा समावेश १८ टक्के कर असलेल्या स्लॅबमध्ये करण्यात आला. यामुळे आता २८ टक्के कर असलेल्या वस्तूंची संख्या फक्त ५० वर आली आहे. तर १८ टक्क्यांचा स्लॅब सर्वात मोठा झाला आहे. जवळपास निम्म्या वस्तू आणि सेवांवर १८ टक्के कर आहे.