अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी आज कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या करामध्ये म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये चांगलीच कपात करण्यात आली असून त्याचे शेअर बाजाराने धुमधडाक्यात स्वागत केले आहे. सीतारमन यांच्या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांकानं शुक्रवारी सकाळी 1900 अंकांची उसळी घेत 38 हजारांचा पल्ला पार केला. करकपातीचा निर्णय गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी जाहीर केला.

गेला काही काळ मंदीची भीती व्यक्त करण्यात येत होती. विशेषत: गेल्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी अवघ्या पाच टक्क्यांनी वाढल्याच्या तसेच गेल्या वर्षभरात वाहन उद्योग क्षेत्राला लागलेल्या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने नमूद केले असून शेअर बाजाराने अर्थात गुंतवणूकदारांनी याचे स्वागत केले आहे.

देशातील उत्पादन कंपन्यांना आता सर्व अधिभारांसहीत 25.17 टक्के कर द्यावा लागणार आहे. याव्यतिरिक्त कंपन्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तसच देशातील कंपन्यांवार लागणारा MAT देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅपिटल गेनवर लागणारा सरचार्जही आता आकारण्यात येणार नाही.

भारतीय कंपन्यांनी जर कुठल्याही अन्य सवलती घेतल्या नसतील तर फक्त 22 टक्के इतका इन्कम टॅक्स या कंपन्यांना भरावा लागणार आहे. त्यावरील अधिभार व अन्य भार धरून कमाल कर 25.17 टक्के आहे. ही कपात जवळपास 10 टक्क्यांची आहे. या म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून नवीन दर लागू होणार आहेत. तर नवीन 1 ऑक्टोबर नंतर सुरू करण्यात येणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील नवीन कंपन्यांना अवघा 15 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

भाडंवली किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम रहावा यासाठी कॅपिटल गेन्स टॅत्सवरील वाढीव सरचार्ज, जो 2019च्या बजेटमध्ये जाहीर केला होता, तोही रद्द करण्यात आला आहे.  अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या सवलतींमुळे देशाच्या तिजोरीत महसुलाच्या रुपानं जमा होणाऱ्या रकमेत 1.45 लाख कोटी रुपयांची तूट जाणवणार आहे.