उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी महिलांना मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी महिला लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत. यामुळे २० कोटी महिलांना लाभ मिळणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

स्वयंसहायता समुहांना २० लाखांचं कर्ज
महिला स्वयंसहायता समुहांना दीनदयाल योजने अंतर्गत २० लाख रूपयांचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यापूर्वी त्यांना या योजनेअंतर्गत १० लाख रूपयांचे कर्ज देण्यात येत होते. याव्यतिरिक्त वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी १ हजार रूपये देण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांमध्ये ही रक्कम वितरीत करण्यात येणार असून ३ कोटी लोकांना याचा लाभ मिळणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

आणखी वाचा- मोदी सरकारची मोठी घोषणा; ईपीएफ खात्यात भरणार पैसे

१ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज
देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- किसान सन्मान : देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

उपाशी राहणार नाही याची काळजी घेणार
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहितीही सीतारामन यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.