नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्याचे पैसे आपल्या खात्यात जमा करुन पैसे कमविण्याची शक्कल महागात पडू शकते, असे संकेत अर्थ विभागाकडून देण्यात आले आहेत. सरकारने ५०० आणि १००० रुपयाच्या नोटाबंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काळ्यापैशाचा साठा असणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. बँकांमध्ये काळा पैसा जमा करणे अशक्य असल्यामुळे देशातील काही मंडळी दुसऱ्याच्या खात्याचा उपयोग करुन आपला काळा पैसा पुन्हा चलनात आणण्याची शक्कल लढवताना दिसत आहेत. दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्यासाठी काळा पैसा धारण करणारी मंडळी विशेष मोबदला देण्याचे आमिष देखील दाखवत आहेत. काळेपैसा वैध करण्याच्या या प्रकारात आमिषामुळे अनेकजण सहभागी देखील होत आहेत.

काळ्या पैशाला वैध ठरविण्यासाठी लढविण्यात येणारी ही शक्कल दोन्ही पक्षांना महागात पडेल अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारने व्यवहारातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा हद्दपार केल्यानंतर २ लाख ५० हजारांपर्यंत रक्कम खात्यात असणाऱ्या खातेदारांची आयकर विभाग चौकशी करणार नसल्याचे सांगण्यात आले होते. पण काळा पैसा धारकांनी या सवलत देण्यात आलेल्या खातेदारकांचा फायदा उचलून सरकारच्या निर्णय व्यर्थ ठरवू नये म्हणून सरकारने दुसऱ्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी सूचना जारी केली आहे. दुसऱ्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा करणाऱ्या खातेधारकास आयकर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर शिक्षेस सामोरे जावे लागेल, असे वित्त विभागाने म्हटले आहे.

दुसऱ्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये ठेवण्याच्या घटनेमध्ये जनधन योजनेतून उघडण्यात आलेल्या काही खात्यांचाही वापर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जनतेने दुसऱ्या व्यक्तीचे पैसे आपल्या खात्यावर जमा करुन घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील यासाठी वित्त विभागाने नागरिकांना सावध केले आहे.