|| अभिषेक अंगद

वाहन उद्योगावरील आर्थिक संकटामुळे संसाराचे गणित बिघडले

सकाळी नऊची वेळ. साधारण दोनशे रोजंदारी कामगार जमशेदपूरच्या इमली चौकात कामाच्या आशेने बसलेले असतात. एखादा कंत्राटदार येईल व आपल्याला काम देईल असे त्यांना वाटत असते, पण अकरा वाजून जातात.. मग त्यांची घालमेल सुरू होते व काम न मिळताच ते हळूहळू घरची वाट धरतात..

वाहन उद्योगाचा बऱ्यापैकी पसारा जमशेदपूरमध्ये आहे. एरवी या लोकांना काम मिळत होते, पण आता हातांना काम राहिलेले नाही. साधारण तीन महिन्यांपूर्वी अशी स्थिती नव्हती. त्यांना काम मिळत होते. इमली चौकात अशी कामगारांची गर्दी राहात नव्हती. त्यांना कंत्राटदार पटापट कामे देऊन घेऊन जात असत.

जमशेदपूरपासून तीस कि.मी. अंतरावर असलेल्या  सराईकेला व राजनगरचे कामगार या वाहन उद्योगाशी निगडित पूरक उद्योगांत काम करतात. पोलादासाठी प्रसिद्ध असलेल्या जमशेदपुरात आता रोजंदारी कामगारांची गर्दी सरता सरत नाही,अशी परिस्थिती आहे.  वाहन उद्योगात मंदीमुळे निराशाजनक परिस्थिती आहे. त्यामुळे पूरक उद्योगांच्या कामगारांनाही फटका बसला आहे. टाटा स्टील व टाटा मोटर्स हे दोन मोठे कारखाने असलेल्या या परिसरावर अशी अवकळा येईल असे कुणाला वाटले नव्हते. ग्रामीण भागातून आलेल्या कामगारांना त्यांची रोजीरोटी या कारखान्यांना सुटे भाग पुरवणाऱ्या कारखान्यांमुळे मिळत होती. झारखंडची शेती पावसावर अवलंबून आहे त्यामुळे ते रोजगाराचे शाश्वत साधन नाही. त्यामुळे हे लोक ‘मनरेगा’वर काम करीतही होते, पण १७१ रुपये रोजात त्यांचे भागत नव्हते. हे पैसेही विलंबाने मिळत त्यामुळे ते या कंपन्यांशी संबंधित उद्योगात रोजंदारीवर काम करणे पसंत करीत होते.

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ातून आलेल्या राजू कुमार याने सांगितले की, गेली दोन वर्षे फोर्जिग युनिटमध्ये काम करीत होतो. बारा तास काम करून साडेचारशे रुपये मिळत होते. मला रोज २५० रुपये मिळाले तरी चालतील पण हाताला काम पाहिजे.  राजनगरच्या बबलू प्रधान याने सांगितले की, जिथे काम करीत होतो त्या पूरक उद्योगात आता आमची गरज नाही, कारण वाहन उद्योग मंदीत आहे.

दुपारी एकपर्यंत कामाची वाट पाहात तिष्ठत बसलेल्या बादल मरांडी याने ‘दी संडे एक्स्प्रेस’ला सांगितले की, काम नाही, त्यामुळे संसाराचे गणित विस्कटले आहे. जानकी देवी ही बराम्बो येथून आलेली. हातात जेवणाचा डबा, कामावर जायचे हाच इरादा, पण काम नाही.

सिंघभूम व्यापार व उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक भालोटिया यांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार प्रत्येक लहान कारखान्यातील किमान दहा लोकांचे रोजगार गेले आहेत. टाटा स्टील व टाटा मोटर्सला फटका बसला आहे त्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्याशी पूरक लहान कारखान्यांवर झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांत लघु व मध्यम उद्योगांना १००० कोटींचा फटका बसला आहे. भालोटिया यांची स्वतची कंपनी आहे. ते सांगतात की, गेल्या चार-पाच महिन्यात कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.  कुशल कामगार तरीही ठेवले आहेत.

तीन पाळ्यांऐवजी एकच

टीएमएफ या सुटे भाग बनवणाऱ्या कंपनीने  हिंदीत लावलेल्या सूचनेत म्हटले आहे की, बाजारात मागणी नसल्याने कारखान्यातील काम ७ ते १८ ऑगस्ट बंद राहणार आहे. टीएमएफचे मालक रूपेश कत्रियार यांनी सांगितले की, पूरक उद्योग मुख्य कंपनीला सुटे भाग पुरवतात पण त्यात स्थिर दराने पैसे मिळतात. आता त्यांच्याकडेच मागणी नाही त्यामुळे ते आम्हाला काम देऊ शकत नाहीत. आदित्यपूर लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष इंदर अग्रवाल यांनी सांगितले की, टाटा मोटर्स व टाटा स्टीलवर ८०० पूरक उद्योग अवलंबून आहेत. आधी तीन पाळ्यात हे उद्योग चालू होते पण आता एकच सुरू आहे. आमचा व्यवसाय दोन तृतीयांशाने कमी झाला आहे.

आव्हानात्मक परिस्थिती- टाटा उद्योग

जमशेदपूरच्या टाटा मोटर्स कंपनीत जड वाहने तयार होतात. तेथे १० हजार लोक कामाला आहेत. त्यापैकी निम्मे कंत्राटी कामगार आहेत. उद्योग सूत्रांच्या मते, कंपनी महिन्याला १० ते १२ हजार वाहने बनवते. पण आता त्यांची संख्या २५००-३००० आहे. टाटा मोटर्सच्या सूत्रांनी निश्चित आकडा सांगण्यास नकार दिला. त्यांचा प्रवक्ता म्हणाला की, आताची परिस्थिती आव्हानात्मक आहे. आम्ही मागणीनुसार उत्पादन सुरू केले आहे. कामाच्या वेळा  आणि मनुष्यबळही  कमी केले  आहे.

सरकारने हस्तक्षेप करावा- कामगार संघटना

टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष गुरमित सिंग  यांनी सांगितले की, जमशेदपूर व लखनौ येथे महिन्याला चार हजार वाहने तयार होतात, पूर्वी ती संख्या १० ते १२ हजार होती. सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. खाणकामे सुरू केली तर वाहनांना मागणी येऊ शकेल.  टाटा मोटर्सचे माजी संघटना प्रमुख प्रकाश कुमार यांनी सांगितले की, जुलैपासून टाटा कंपनीत १० ते १४ दिवस काम  बंद होते. कं त्राटी कामगार तर वाऱ्यावर, तर कायम कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन आहे.