गुलाबाला एक गोडसर असा वास असतो त्याचे कारण उलगडले असून त्यामागे एक वितंचक म्हणजे विकर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच गुलाबाला एक  मन रिझवणारा असा सुवास येत असतो. ज्या गुलाबांचा असा वास लुप्त झाला आहे त्यांना तो प्राप्त करून देता येईल असे या संशोधनातून दिसून येत आहे.

गुलाबापासून सौंदर्यप्रसाधनांसाठी तेल काढले जाते. सुगंधी अत्तरात त्याचा वापर केला जातो. गुलाब हाच मुळात सौंदर्य असल्याने दृष्टी सौख्यही देत असतो, पण अलीकडे काही गुलाबांच्या प्रजातींमध्ये सुगंध आढळत नाही. त्यांना तो पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गुलाबाच्या सुवासाचे जैविक विश्लेषण करण्यात आले आहे.

आतापर्यंत अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, गुलाबाच्या जैवविश्लेषण मार्गावर सुगंध अवलंबून असतो. गुलाबामध्ये सुवासिक अल्कोहोल तयार होत असते त्याला मोनोटेरेरीन्स म्हणतात. त्यात टेरिपिन सिंथेसेसचा वापर केला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते टेरेपिन हा केवळ मोनोटेरेपिन्सच्या उत्पादनाचा एकमेव मार्ग आहे ,असे असले तरी गुलाबाच्या दोन प्रजातींमधील जनुकांवर संशोधन करण्यात आले असता त्यांचा वापर गुलाबाला सुवास आणण्यासाठी करता येईल, असे फ्रान्समधील एटनी या लायन सेंट विद्यापीठातील जीन लुईस मगनार्ड यांनी म्हटले आहे. फुलांना सुवास प्राप्त करून देणारी विकरे अगदी वेगळय़ा समूहातील असतात असे त्यांचे मत आहे. पापा मेलँड व रोग मेलँड या दोन प्रजातींमधील ट्रान्स्क्रिप्टोमची तुलना केली असतात ते फार थोडा सुगंध निर्माण करतात कारण त्यांच्यात जनुकीय फरक आहे.

फुलांच्या पाकळ्यांमध्ये असलेल्या सायटोप्लाझम (पेशीद्रव्य) पेशीमध्ये असलेल्या आरएचएनयूडीएक्स १ या जनुकाचा वापर सुगंध निर्माण करण्यासाठी होतो. त्यात मोनोटेरेपीन गेरनिऑल या घटकामुळे सुगंध येतो. त्यामुळे गुलाबाच्या तेलाचा तो महत्त्वाचा घटक असतो. आगामी काळात वनस्पतिशास्त्रज्ञ आरएचएनयूडीएक्स १ या जनुकाचा वापर सुगंध गमावलेल्या फुलांना सुगंध प्राप्त करून देण्यासाठी करू शकतील.