घोषणा क्रमांक ६२ लवकरच; ३० डिसेंबरनंतर

चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आता केवळ  चारच दिवस राहिले आहेत. मात्र, त्यानंतरही तुमच्याकडे जुन्या नोटा राहिल्याच तर तुम्हाला दंड भरून त्या जवळ  बाळगता येणार आहेत. केंद्र सरकारकडूनच तसा वटहुकुम जारी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार तुमच्याकडे जर चलनातून बाद झालेल्या दहाहून अधिक जुन्या नोटा ३० डिसेंबरनंतर आढळल्या तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला. तो निस्तरण्यासाठी केंद्राकडून सातत्याने उलटसुलट घोषणा करण्यात आल्या. नोटाबंदीच्या या निर्णयाला आज, मंगळवारी ५० दिवस पूर्ण होत आहेत. जुन्या नोटा बँकेत भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच, या तारखेनंतरही ज्यांच्याकडे जुन्या नोटा सापडतील त्यांना दंड ठोठावण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे समजते. उद्या, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील मुद्दा चर्चेला येऊन वटहुकुम जारी केला जाण्याचीही दाट शक्यता आहे. या वटहुकुमामुळे चलनातून बाद झालेल्या नोटांवर असलेले रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकारचे वचनही आपोआप रद्दबातल ठरणार आहे. १९७८ मध्ये तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने नोटाबंदीनंतर असाच वटहुकुम जारी केला होता.

दहाच नोटांची संमती

चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत जमा करू न शकलेल्यांना आता केवळ दहाच जुन्या नोटा बाळगता येणार आहेत. या नियमाचा भंग नोटाधारकाने केला तर त्याला किमान ५० हजार रुपये किंवा जेवढी रक्कम सापडेल त्याच्या पाचपट दंड करण्याचा केंद्राचा विचार आहे.  मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी शुक्रवापर्यंत मुदत आहे. त्यानंतरही जुन्या नोटा कोणाकडे असल्यास त्यांना त्या ३१ मार्चपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेत जमा करता येतील. मात्र, ही मुदतही आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्ज परतफेड मुभा

निश्चलनीकरण कालावधीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. तीन टक्के व्याजदर सवलतीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ६० दिवसांची अतिरिक्त कर्ज परतफेड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी उशिरा जाहीर केला.