भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून फिहमेकानिका समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुसेप्पे ओर्सी यांना इटलीमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांच्यासह अन्य दोन मध्यस्थांनाही ताब्यात घेण्यात आले. 
१२ एडब्ल्यू जातीची १०१ हेलिकॉप्टर विकत घेण्यासाठी एकूण ३ हजार ५४६ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. या व्यवहाराला अंतिम स्वरुप मिळावे, यासाठी मोठ्या प्रमाणात लाच देण्यात आली होती. आता ओर्सी यांच्या अटकेनंतर आरोपांना पुष्टी मिळाली.
हा करार झाला त्यावेळी जुसेप्पे ओर्सी हे अगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीचे प्रमुख होते. भारताबरोबरच्या या कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी त्यांनी ५१ दशलक्ष युरोची लाच दिल्याचा आरोप आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पहिल्यापासून यासंबंधीच्या बातम्या लावून मध्यस्थ, कंपनी प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांच्यातील दुष्टसाखळी उजेडात आणली होते. ओर्सी यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
ओर्सी यांना अटक झाल्यामुळे फिहमेकानिका कंपनी अडचणीत आली आहे. पहिल्यापासून कंपनीने या व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे म्हटले होते. ओर्सी यांना अटक झाल्यानंतर लगेचच कंपनीने निवेदन प्रसिद्ध करून कंपनीचे रोजचे कामकाज आणि विविध प्रकल्पांवरील काम नियमितपणे सुरू राहिल, असे कंपनीने स्पष्ट केले.