समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्यावर म्हैस चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आसिफ अली आणि जाकिर अली या दोघांनी रामपुर पोलीस स्थानकामध्ये खान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये खान यांच्याबरोबरच माजी कार्यकारी अधिकारी आले हसन यांच्यासहीत इतर सहा जणांच्या नावाचा समावेश आहे. सर्व आरोपींनी आमच्या घरात घुसून तोडफोड केली, शिविगाळ केला आणि आमची म्हैस चोरुन नेल्याचे आसिफ आणि जाकिर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवाब राजा अली खां यांनी सराय गेट येथे गरीबांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. याच ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून अली कुटुंब राहत होते. १५ ऑगस्ट २०१६ रोजी पहाटे सव्वापाच वाजता कार्यकारी अधिकारी आले हसन, ठेकेदार इस्लाम, शिपाई धर्मेंद्र, फसाहत शानू, वीरेंद्र गोयल यांच्यासहीत इतर २० ते २५ लोकांनी घरामध्ये बळजबरीने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देत घरातील वस्तूंची तोडफोड करु लागले. या ठिकाणी आझम खान यांना शाळा बांधायची असल्याने ते बळजबरीने घर खाली करण्यासाठी तेथे राहणाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

घरामध्ये घुसून घर खाली करण्याची धमकी देणाऱ्यांना अली बंधूंने त्यांच्याकडील भाडे पावत्या आणि घरासंदर्भातील कागदपत्रे दाखवले. मात्र जास्त हुशारी करण्याची प्रयत्न केल्यास जीव गमावावा लागेल अशी धमकी आम्हाला देण्यात आल्याचे अली यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर या कुटुंबाला घरातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचे घर बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आले. घरातील २५ हजार रुपये रोख रक्कम आणि किंमती सामानाही चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नाही घराबाहेर दावणीला बांधलेली म्हैसही या लोकांनी आपल्याबरोबर नेली असं तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले. आजही ही म्हैस आझम खान यांच्या गोशाळेमध्ये आहे असंही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कलम ५०४, ५०६, ४२७, ३९५, ४४८, ४५२, ३२३, ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.