कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या कृतीनंतर काश्मिरी जनतेला विश्वास देण्यासाठी पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकतीच रॅली काढली. या रॅलीमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनी इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक विद्यार्थ्यांचा हा विरोध न पचल्याने पाक सरकारने या विद्यार्थ्यांवर दडपशाहीचे धोरण अवलंबत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

आम्ही काश्मिरी जनतेसोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी पीओकेतील मुज्जफराबाद येथे पाकिस्तानमधील काही भागातून मोठ्या प्रमाणावर लोक बोलवून इम्रान खान यांनी रॅली काढली होती. इतके करुनही या रॅलीमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. तर काही स्थानिक लोकांनी इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर पाकिस्तानी सरकारने गुन्हे दाखल केले असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या काही स्थानिक उर्दू भाषेतील माध्यमांनी दिले आहे.

या प्रकारामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला असून यानिमित्ताने काश्मिरी जनतेवरील पाकिस्तानच्या दडपशाहीचा नमुनाही समोर आला आहे.