News Flash

स्त्रियांच्या स्तनांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथे ८० टक्के विद्यार्थींनी असून बहुसंख्य मुस्लिम आहेत

स्त्रियांच्या स्तनांची कापलेल्या कलिंगडाशी तुलना करणाऱ्या केरळमधील प्राध्यापकाविरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जोहर मुनावीवीर असे या प्राध्यापकाचे नाव असून तो कोझीकोड येथील फारूख ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक आहे. आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थींनीच्या पोषाखाबद्दल जोहरने हे वादग्रस्त वक्तव्य केले. कॉलेजमध्ये येणाऱ्या मुली त्यांची संपूर्ण छाती हिजाबने झाकून घेत नाहीत. आपल्या छातीचे कापलेल्या कलिंगडासारखे प्रदर्शन करतात असे वक्तव्य जोहरने केले होते.

मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथे ८० टक्के विद्यार्थींनी असून बहुसंख्य मुस्लिम आहेत. धार्मिक परंपरेप्रमाणे या मुली पोषाख परिधान करत नाहीत. हिजाबने त्या आपली छाती झाकून घेत नाहीत. कापलेल्या कलिंगडासारखा छातीचा काही भाग दाखवतात असे जोहर मुनावीवीर म्हणाला होता.

जोहर मुनावीवीरच्या या विधानाचा दोन विद्यार्थिनींनी टॉपलेस फोटो पोस्ट करुन निषेध केला. आम्ही या कृतीतून वक्तव्याचा निषेध केला असल्याचे या विद्यार्थिनींनी म्हटले होते. हे फोटो काही काळातच व्हायरल झाले. फोटो व्हायरल झाल्यावर याची चर्चाही चांगलीच झाली. त्यामुळे फेसबुकने या दोन मुलींचे अकाऊंट बंद केले आणि हे फोटो काढून टाकले. मात्र या शिक्षकाचा निषेध केला जातो आहे.

महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या शिक्षकाचा निषेध म्हणून त्याला अर्धी कापलेली कलिंगडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक विद्यार्थिनीही या वक्तव्याचा निषेध सोशल मीडियावर आणि जाहीररित्याही करताना दिसत आहेत. आम्ही काय कपडे घालायचे, कसे दिसायचे हा आमचा अधिकार आहे. त्यावर शेरेबाजी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. कोणत्याही मुलीच्या शरीराबाबत अश्लील टिपण्णी करण्याचा अधिकार कोणालाही नाही असे या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 7:26 pm

Web Title: fir lodged against kerala professor
टॅग : Kerala,Professor
Next Stories
1 ‘मी मूर्ख आहे, अपयशी आहे..’ आत्महत्या केलेल्या ९ वीच्या मुलीच्या वहीत मजकूर
2 जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा, जमाव पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे
3 FB बुलेटीन: कार्ती चिदंबरमना जामीन, मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न आणि इतर बातम्या
Just Now!
X