वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी आझम खान यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं.

आयपीसी कलम 500 आणि 505 अंतर्गत आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर महासभेचे सरचिटणीस अमर नाथ प्रजापती यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हजरतगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी राधारमण सिंह यांनी दिली आहे.

प्रजापती यांनी केलेल्या आरोपानुसार, 2016 मध्ये गाजियाबाद येथे हज हाऊसच्या उद्घाटनादरम्यान आझम खान यांनी आंबेडकरांसंबधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी आझम खान यांनी आंबेडकरांचा जमीन आपल्या ताब्यात घेणारी व्यक्ती असा उल्लेख केला होता.

आझम खान यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोकडे इशारा करत म्हटलं होतं की, ‘ही व्यक्ती हाताने इशारा करत आहे की जिथे ते उभे आहेत ती जमीन आमची आहे आणि समोरची जमीनही माझी आहे’.