करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम केअर फंड तयार केला होता. या फंडाविषयी काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून ११ मे रोजी ट्विट करण्यात आलं होतं. याप्रकरणी कर्नाटकातील शिवमोगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआरआयमध्ये ट्विटर हॅण्डल सोनिया गांधी चालवत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

करोनाचा प्रसार रोखण्याबरोबर मदतनिधी उभारण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम केअर फंड सुरू केला आहे. या फंडात करोनाविरोधात लढण्यासाठी मदत जमा करावी, असं आवाहन केंद्राच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यानंतर पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशावरून काँग्रेसनं सरकारवर टीका केली होती. नेमक्या कोणत्या ट्विटवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कर्नाटकातील प्रवीण के.वी. नावाच्या व्यक्तीनं सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीवरून शिवगोमा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही व्यक्ती भाजपा कार्यकर्ता असून पेशानं वकील आहे. ११ मे रोजी पीएम केअर फंडबद्दल काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटवरून गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेत्याला अटक

११ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरून अनेक ट्विट करण्यात आले होते. यात काही ट्विटमधून पीएम केअर फंडात पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला होता. “भाजपाच्या प्रत्येक योजनेप्रमाणे पीएम केअर फंडाबद्दल गोपनीयता बाळगली जात आहे. पीएम केअर फंडाला मदत देणाऱ्या भारतीयांना या निधीतून केलेल्या कामाची माहिती व्हायला नको का?,” असं एक ट्विट करण्यात आलं होतं. याचबरोबर इतरही ट्विट ११ मे रोजी करण्यात आले होते.