बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रीय जनता दलास(राजद) आणखी एक मोठा झटका बसला आहे. राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे.

मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याचा आरोप करून, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा- बिहार विधानसभा : ‘एनडीए’त फूट; पासवानांच्या ‘लोजपा’चा स्वबळाचा नारा

राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबीयाचा आरोप आहे की ही लोकं मलिक शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी देत होते.