जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मारहाण झालेल्या जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष अयेषी घोष हिच्यासह १९ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वर रुमची तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण प्रकरणी आयेषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार जानेवारी रोजी जेएनयूच्या सर्वर रुममध्ये तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहनांवर हल्ला केल्याच्या तसेच सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपांखाली आयेषी घोष हिच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती.

जेएनयूच्या तीन वसतिगृहांमध्ये पाच जानेवारी रोजी संध्याकाळी मोठा गोंधळ झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच होस्टेलमध्ये तोडफोडही करण्यात आली होती. विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोषवरही हल्ला करण्यात आला होता. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. हा हल्ला घडवून आणणारे हल्लेखोर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र, बुरखाधारी हल्लेखोरांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या घटनेनंतर जेएनयूतील साबरमती हॉस्टेलच्या दोन वॉर्डननी राजीनामा दिला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवू शकलो नाही असे सांगत वरिष्ठ वॉर्डन राम अवतार मीणा आणि प्रकाश साहू यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

जेएनयूच्या आवारात घुसून रविवारी रात्री उशीरा काही बुरखाधारी लोकांनी धुगघूस घातला होता. विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये १८ विद्यार्थी आणि काही प्राध्यापक जखमी झाले होते. सुमारे ५ तास हा गोंधळ सुरु होता. जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोष हीच्या डोक्यात मारहाण झाल्याने ती गंभीर जखमी झाली होती. अनेक जखमी विद्यार्थ्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हा हल्ला एबीव्हीपीच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला होता. तर एबीव्हीपीने याचा इन्कार करीत डाव्या विद्यार्थी संघटनांवर उलटा आरोप केला होता.