२०१९च्या निवडणुकांदरम्यान लोकसभेच्या तिकिटासाठी ५ कोटी रुपये स्वीकारल्याच्या आरोपाखाली पटणा न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, मीसा भारती यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते राजेश राठोड आणि काँग्रेसचे दिग्गज सदानंद सिंह यांचा मुलगा शुभानंद मुकेश यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वांवर पैसे घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पटनाचे मुख्य न्यायदंडाधिकारी विजय किशोर सिंह यांच्या न्यायालयाने  पोलीस ठाण्याला सहा नेत्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते आणि वकील संजीवकुमार सिंह यांनी १८ ऑगस्ट रोजी पाटण्याच्या सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली होती. संजीव सिंह यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमध्ये बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्यासह बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा, सदानंद सिंह, राजेश राठोड यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. भागलपूरमधून लोकसभेचे तिकीट देण्याच्या बदल्यात १५ जानेवारी २०१९ रोजी पाच कोटी रुपये घेतले पण तिकीट देण्यात आले नाही असा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर संजीवकुमार यांना विधानसभा निवडणुकीत तिकीटाचे आश्वासन देण्यात आले होते पण तेही मिळाले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी तेजस्वीशी संपर्क साधल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे संजीवकुमार यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकरणी पाटणा मुख्य न्यायदंडाधिकारी विजय किशोर सिंह यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यानंतर, ३१ ऑगस्ट २०२१ रोजी आदेश राखून ठेवण्यात आला होता. १६ सप्टेंबर रोजी पाटण्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांद्वारे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत विरोधी पक्षनेते तेजस्वी, मीसा, मदन मोहन झा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. आतापर्यंत न्यायालयाचा आदेश प्राप्त झालेला नाही. न्यायालयाचा आदेश आला आहे की नाही ते पाहिले जाईल. जर कोर्टाकडून असा कोणताही आदेश असेल तर त्याचे पालन करून गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.