दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील भागात एका रूग्णालयात लागलेल्या आगीत २१ जण मरण पावले, तर इतर सात जण जखमी झाले. विशेष करून विसराळूपणा व मेंदूविषयक रोग झालेल्या रूग्णांना येथे ठेवण्यात आले होते.
जँगसाँग परगण्यातील ह्योसरंग रूग्णालयात जिथून आग सुरू झाली तिथे विसराळूपणाचा विकार असलेली एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दृश्यफितीत ही व्यक्ती त्या भागात दिसल्याचे समजते. पोलिसांनी आणखी माहिती देण्यास नकार दिला असून आगीच्या कारणांचा तपास अजूनही सुरू आहे.
जँगसेऑंगच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, वीस रूग्ण व एक परिचारिका असे २१ जण भाजून मरण पावले तर सात जण जखमी झाले आहेत. किम जिऑँग बे या अग्निशमन अधिकाऱ्याने इमारतीत प्रवेश केला होता; त्याने सांगितले की, आपण जळालेले मृतदेह बाहेर काढले. या रूग्णालयात दुसऱ्या मजल्यावर एकूण ३४ रूग्ण होते व परिचारिका होती. किमान २७० अग्निशमन जवानांनी ही आग सहा मिनिटात विझवली. पहिल्या मजल्यावर ४५ रूग्ण व एक परिचारिका होती परंतु ते सर्व जण वाचले.दक्षिण आफ्रिकेच्या ‘योनहप’ या वृत्तसंस्थेने सांगितले की, मृतांपैकी काही जणांचे हात बिछान्याला बांधलेले होते पण ही माहिती नेमकी कुणी दिली हे समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हात बांधून ठेवण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. अनेक मृतदेह बिछान्यावर व जमिनीवर आढळून आले पण त्यांचे कुणाचेही हात बांधलेले नव्हते. रूग्णांना बांधून ठेवलेले नव्हते असे रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले. दक्षिण कोरियात सध्या सुरक्षा त्रुटींची चर्चा सुरू  असतानाच ही घटना घडली आहे.