जम्मू आणि काश्मीर सचिवालय परिसरातील दुमजली विस्तारित कक्षाला लागलेल्या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली. कक्षाची संपूर्ण लाकडी रचना असल्याने आग मोठय़ा प्रमाणात भडकत गेली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग अटोक्यात आणण्यात यश मिळाले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.
सकाळी साडेनऊ वाजता कार्यालये सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी विस्तारित कक्षातून आगीचे लोळ येताना दिसले. यामध्ये लेखा विभाग, कोषागार कार्यालये तसेच दस्तावेजाची खोली आहे.इमारतीत लाकूड असल्याने आग तातडीने भडकली. अग्निशामक बंबांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. आगीचे कारण कळू शकलेले नाही.
या आगीमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात दस्तावेज नष्ट झाल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले. आगीत मोठे नुकसान झाल्याने दुरुस्ती करण्यास काही कालावधी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विस्तारकक्षामध्ये तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वन, कोषागार यांची कार्यालये आहेत.