प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये बिहारचे राज्यपाल लालजी टंडन थोडक्यात बचावले आहे. कुंभमेळ्यात आग लागल्याची ही आतापर्यंतची पाचवी घटना आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी पहाचे कुंभमेळ्यात एका कॅम्पमध्ये अचानक आग लागली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ज्यावेळी आग लागली तेव्हा बिहारचे राज्यपाल लालजी टंडन झोपेत होते. आग लागल्यानंतर टंडन यांनी लगेच सर्किट हाऊसमध्ये पलायन केले. या आगीमध्ये टंडन यांचा मोबाइल, चश्मा, घड्याळ आणि अन्य सामान जळून खाक झाले आहे.

बुधवारी पहाटे अडीच वाजता सेक्टर-२०च्या अरैल भागात असलेल्या त्रिवेणी टेंट सिटीमध्ये आगीची घटना घडली. या टेंट सिटीमध्ये लालजी टंडन थांबले होते. रात्री अचानक आग लागल्यामुळे टेंट सिटीमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी सुरक्षारक्षकांनी तात्काळ टंडनसोबत अन्य लोकांना सुरक्षित स्थळी हालवले. या आगीमध्ये टेंट आणि अन्य सर्व सामान जळून खाक झाले.

कुंभमेळ्यात आगीची घटना यापूर्वीही चार वेळा घडली आहे. याआधी पाच फेब्रुवारी रोजी सेक्टर १५ मध्ये असणाऱ्या नाथ संप्रादयाच्या दोन शिबिराला आग लागली होती. त्यावेळी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले होते. जानेवारी महिन्यात कुंभमेळ्यात तीन वेळा आगीची घटना घडल्या आहेत. १९ जानेवारी रोजी सेक्टर-१३मध्ये आग लागली होती. याआधी कुंभमेळ्यात सोमवारी ( १४ जानेवारी) दिगंबर आखाड्यातील १२ हून अधिक तंबू भीषण आग लागली आहे. ही आग सिलेंडर स्फोटमुळे झाली होती. या आगीत जीवितहानी झाली नाही.

बिहारचे राज्यपाल लालजी टंडन