हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला ते कालका दरम्यान धावणाऱ्या टॉय ट्रेनला आज(दि.8) दुपारी अचानक आग लागली. सोलन जिल्ह्यातील कुमारहाटी आणि धर्मापूर दरम्यान ट्रेनच्या इंजिनने अचानक पेट घेतला. त्यावेळी ट्रेनमध्ये जवळपास 200 प्रवासी होते.


 
दुपारी 12 च्या सुमारास 52455 क्रमांकाची हिमालयीन क्वीन शिमल्याच्या दिशेने जात होती. धर्मापूरहून थोडे पुढे कुमारहट्टी येथे आल्यावर रेल्वेच्या इंजिनात अचानक आग लागली. इंजिनमधून अचानक धूर निघायला लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि मोठ्या संख्येने मदतीसाठी पोहोचलेल्या स्थानिकांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर नवं इंजिन आणून ती ट्रेन शिमल्याला पोहोचली. दरम्यान, कालका ते शिमला हा मार्ग विश्व हेरिटेज म्हणून घोषीत करण्यात आला आहे. येथे अशाप्रकारची घटना घडल्यामुळे आश्चर्च व्यक्त केले जात आहे.

सात कोच असलेल्या या टॉय ट्रेनला आग लागली त्यावेळी ट्रेनमध्ये 200 प्रवासी होते. आग लागण्याच्या घटनेनंतर तातडीने दुसरं इंजिन बोलावण्यात आलं आणि प्रवाशांना शिमल्याला पोहोचवण्यात आलं.