मुख्यमंत्री राव यांच्या कार्यक्रमासाठीची राष्ट्रपतींची भेट रद्द
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या यज्ञाच्या कार्यक्रमात आग लागली. सुदैवाने त्यात कुठलीही हानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे यज्ञास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी जी भेट देणार होते ती रद्द करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात कुठलीही हानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कुणीही जखमी झालेले नाही. गेले पाच दिवस हा अयुथा चंडी महायज्ञ चालू आहे. राव यांच्या फार्म हाऊसवर हा यज्ञ सुरू असून तेथे शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. या यज्ञात सरकारी पैसा वापरलेला नाही, असा खुलासा चंद्रशेखर राव यांनी आधीच केला आहे.
मेडक जिल्ह्य़ात एरावेली खेडय़ात हा यज्ञ सुरू असून रविवारी दुपारी दीडच्या सुमारास यज्ञाच्या आसनास आग लागली, ती यज्ञशाळेपर्यंत पसरली. यज्ञशाळा ही गवताने शाकारलेली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब बोलावण्यात आले. यज्ञशाळेचे छप्पर यात काही अंशी जळाले असून आग आटोक्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे यज्ञास रविवारी उपस्थित राहणार होते; पण आगीच्या घटनेनंतर त्यांनी दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. २३ डिसेंबरपासून विश्व कल्याण व शांतीसाठी हा यज्ञ सुरू करण्यात आला आहे.