दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आग विझवताना मरण पावलेल्या अग्निशमन दलाचा जवानच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत केली आहे. अमित कुमार बालियान या जवानाच्या कुटुंबियांकडे केजरीवाल यांनी बुधवारी एक कोटींचा चेक सुपूर्द केला. २ जानेवारी २०२० रोजी पीरागढी येथे एका बॅट्री बनवणाऱ्या कारखान्यामध्ये आग लागली होती. या आगीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवताना अमितचा मृत्यू झाला होता. अमितचे लग्न होऊन एक वर्षही झालं नव्हतं. २०१९ ला फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या ११ महिन्यांनी अमितचा मृत्यू झाला. अमितच्या कुटुंबामध्ये त्याचे आई-वडील, छोटा भाऊ आणि दोन छोट्या बहिणी आहेत. या आर्थिक मदतीमुळे आता बालियान कुटुंबियांवरील आर्थिक भार हलका होणार आहे.

“अमित कुमार यांनी जीवाची बाजी लावून आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अमित यांनी लोकांचा जीव वाचवताना स्वत:चे प्राण गमावले. संपूर्ण देश आणि दिल्ली शहरवर त्यांचे ऋण आहे. त्यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांना दु:ख झालं आहे. त्यांच्यासारख्या हिंमत दाखवणाऱ्या लोकांमुळेच दिल्ली सुरक्षित आहे. दिल्लीमध्ये कुठेही आग लागली तरी अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावून आग विझवण्याचा आणि सर्वांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात,” अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी अमितच्या स्मृतींना उजाळा दिला.

केजरीवाल यांनी ट्विटवरुन धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याची माहिती दिली आहे. “अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या अमित कुमार यांनी शौर्य दाखवत लोकांचा जीव वाचताना स्वत:चा जीव गमावला. दिल्ली त्याच्या बलिदानासाठी त्यांना सलाम करते. आज त्यांच्या कुटुंबियांना भेट घेऊन एक कोटी रुपयांचा सन्मान निधी सूपूर्द केला. या निधीचा कुटुंबाला थोड्याफार प्रमाणात नक्कीच फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे,” असं केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमित यांनी १० जून २०१९ ला प्रशिक्षण पूर्ण करुन अग्निशमन दलामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांमध्ये त्यांचा दूर्देवी मृत्यू झाला.

अमितच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी केजरीवाल यांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केलं होतं. त्याच वेळेस त्यांनी कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन केजरीवाल यांनी पूर्ण केलं.