गुरुग्राम येथील जिल्हा न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला तरी पोलिसांना अद्याप या हत्येमागचा नेमका उद्देश शोधून काढता आलेला नाही. न्यायाधीशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबल महिपालनेच शनिवारी संध्याकाळी सेक्टर ४९ मधील बाजारपेठेत पत्नी आणि मुलावर गोळीबार केला. न्यायाधीशाच्या पत्नीचा या गोळीबारात मृत्यू झाला असून मुलाची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी दिवसभर पोलिसांनी महिपालची कसून चौकशी केली. पण ठोस असे काही हाती लागलेले नाही. पोलिसांना एवढेच समजले आहे कि, महिपाल एका गुरुला आणि गुरु माँ ला प्रचंड मानतो. त्या दोघांचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे. पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत. महिपालची मानसिक स्थिती ठिक नव्हती किंवा त्याने याआधी हिस्त्रपणा केल्याचे कुठेही आढळलेले नाही. त्यामुळे त्याने नक्की गोळीबार का केला ? हे शोधून काढणे पोलिसांसाठी कठिण जातेय.

न्यायाधीश कृष्ण कांत यांचा मुलगा ध्रुवची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पत्नी रितूचे अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले आहेत. पोलिसांना महिपालची चार दिवसांची कोठडी मिळाली आहे. त्याच्यावर हत्येचे कलम ३०२ लावण्यात आले असून पोलीस सेवेतून त्याला बर्खास्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. महिपाल २०१६ सालापासून न्यायाधीशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होता पण त्याने आपल्याला त्रास किंवा वाईट वागणूक दिली जातेय अशी कधीही तक्रार केली नाही. महिपालच्या कौटुंबिक जीवनात तणाव सुरु होता. त्याचे त्याच्या पत्नीबरोबर पटत नव्हते अशी माहिती समोर आली आहे.