करोना व्हायरसमुळे चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडू शकतात. या सर्व कंपन्यांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करण्याची हीच नामी संधी आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सुरु आहे. भारतात अजून चर्चाच सुरु आहे. पण वास्तवातलं चित्र मात्र यापेक्षा थोडं वेगळं आहे. चीनमधून काही कंपन्या बाहेरही पडल्या आहेत. पण यामागे फक्त करोना व्हायरसचा प्रादुर्भाव हे एकमेव कारण नाहीय. अमेरिका-चीनमध्ये सुरु असलेलं व्यापार युद्धही त्याला कारणीभूत आहे.

उत्तर अमेरिकन आणि युरोपियन खरेदीदारांकडून अचानक दक्षिण पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये तपासणी आणि ऑडिट करण्याची मागणी वाढली असे हाँगकाँग स्थित किमा कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. किमा ही क्वालिटी कंट्रोल कंपनी आहे. वेगवेगळया कंपन्या नव्या भागांमध्ये आपले कारखाने हलवण्याआधी या तपासणी आणि ऑडिट रिपोर्टची मदत घेतात. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

किमाच्या रिपोर्टनुसार दक्षिण पूर्व आशियासाठी ४५ टक्के मागणी वाढली. यामध्ये व्हिएतनाम, म्यानमार आणि फिलीपाईन्स हे देश आहेत. दक्षिण आशियासाठी ५२ टक्के मागणी होती. यात कापड उद्योगासाठी बांग्लादेशला विशेष पसंती आहे. करोना व्हायरसमुळे चीनमध्ये लॉकडाउन असताना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उद्योग-व्यवसायासाठी दुसऱ्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ही मागणी वाढली होती.

चीनमधून व्यापार शिफ्ट करण्याच्या भावनेमुळे तिथून बाहेर पडणारे उद्योग-व्यवसाय आपल्या देशात आकर्षित करता येऊ शकतात ही अपेक्षा भारतामध्ये निर्माण झाली. उत्तर प्रदेश सारख्या राज्याने यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. कामगार कायद्यामध्ये बदल केले. त्यावर चीनच्या ग्लोबल टाइम्समधून टीका करण्यात आली. पण ज्या कंपन्या चीनमधून बाहेर पडतायत, त्या सगळयाच भारतामध्ये येत नाहीयत.

जपानी वित्तीय समूह नोमुरानुसार या कंपन्यांचे प्राधान्य दक्षिण-पूर्व आशियाला आहे. नोमुराच्या पाहणीनुसार, २०१८-१९ मध्ये चीनमधून बाहेर पडलेल्या ५६ कंपन्यांपैकी व्हिएतनाममध्ये २६, तैवानमध्ये ११, थायंडलमध्ये आठ कंपन्यांनी आपली कार्यालये सुरु केली. फक्त तीन कंपन्या भारतामध्ये आल्या.

कीमाच्या रिपोर्टनुसार सुरक्षित स्थळांना कंपन्यांचे पहिले प्राधान्य आहे. याचाच अर्थ करोना व्हायरसचे संकट चांगल्या पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये या कंपन्या जाऊ शकतात. करोना व्हायरसच्या हाताळणीमध्ये व्हिएतनाम आदर्श उदहारण आहे. या देशाने अत्यंत वेगाने पावले उचलत करोनावर नियंत्रण मिळवले. या देशात करोनाचे ३२७ रुग्ण होते व एकही मृत्यू झाला नाही.