उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका आदेशामुळे नोएडा औद्योगिक केंद्रातील कंपन्यांची चिंता वाढली आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले तर त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल असे नोएडा पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. कंपन्यांनी त्यांच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना मोकळया जागांवर शुक्रवारचे नमाज पठण बंद करण्याचे निर्देश द्यावेत असे उत्तर प्रदेश पोलिसांनी नोएडा सेक्टर ५८ मधील कंपन्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

कर्मचारी निर्देशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल असे या आदेशात म्हटले आहे. मागच्या आठवडयात नोएडामधील पोलीस स्थानकांनी कंपन्यांना ही नोटीस जारी केली. नोएडा सेक्टर ५८ हे औद्योगिक केंद्र आहे. नोटीसमध्ये कंपन्यांना जबाबदार धरण्याचा जो उल्लेख आहे त्या संदर्भात अधिक माहिती समजून घेण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी नोएडाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांच्या या आदेशामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे असे काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नॅशनल कॅपिटल रिजनमध्येही हे आदेश लागू होण्याची भिती आहे. नोएडामधील सेक्टर ५८ मध्ये माहिती-तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील कंपन्या प्रामुख्याने आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता परिसरातील जातीय सलोखा बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे नोएडा पोलिसांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी दुपारी मोठया प्रमाणावर नमाज पठण सुरु असते अशा तक्रारी मिळाल्यानंतर आम्ही आमच्या परिसरातील कंपन्यांना नोटीसा पाठवल्या. नमाज पठण करणारे बहुतांश लोक हे परिसरातील कंपन्यांचे कर्मचारी आहेत. आम्ही कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये कर्मचाऱ्यांना मशिदीत, इदगाह किंवा कार्यालयाच्या छतावर नमाज पठण करण्यास सांगा असे म्हटले आहे. सेक्टर ५८ चे एसएचओ पंकज राय यांनी ही माहिती दिली.