उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत रविवारी पहिला गुन्हा दाखल झाला. बरेलीत एका व्यक्तीविरोधात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी लग्नाचं आमिष दाखवून तरुणीला धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धर्मातरबंदी कायद्यांतर्गत हा देशातील पहिलाच गु्न्हा आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं की, तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. बरेलीस्थित देवरानिया येथील रहिवासी असलेल्या तरुणीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, “आरोपी अवैस अहमद याने शिक्षणादरम्यान आपल्या मुलीशी मैत्री केली. आता तो मुलीला धर्मांतर करुन आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहे.”

मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, लग्नाला विरोध केल्याने अवैस अहमद याने आमच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी पण दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नव्या कायद्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शनिवारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी जबरदस्तीने धर्मांतरविरोधी अध्यादेशाला मंजुरी दिली. या कायद्यानुसार, लग्नाच्या आमिषाने जबरदस्तीने धर्मांतर झाल्याचे सिद्ध झाल्यास दहा वर्षे कैद आणि विविध प्रकारे ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.