कोविड-१९चा विषाणू हा चीनमध्ये ऑक्टोबर २०१९च्या सुरुवातीपासूनच पसरायला सुरुवात झाली होती, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. करोनाचा पहिला रुग्ण वुहान शहरात सापडण्याआधी दोन महिने याचा प्रसार होत असल्याचं समोर येत आहे. ब्रिटनच्या केन्ट विद्यापीठातल्या संशोधकांनी याविषयीचा अभ्यास केला आहे. त्यात त्यांना ही माहिती मिळाली.

ह्या विषाणूच्या उगमाची तारीख १७ नोव्हेंबर २०१९ सांगितली जात आहे आणि याचा जगभरात प्रसार २०२०च्या जानेवारीमध्ये झाला. चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९मध्ये सापडला. त्याचा संबंध वुहानच्या मासळी बाजाराशी जोडला गेला. मात्र, या आधी करोनाच्या झालेल्या प्रसाराचा या बाजाराशी काहीही संबंध नव्हता असं आढळून आलं आहे.

आणखी वाचा- करोनाचा कहर सुरुच! देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण

याबद्दल चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने मार्चच्या शेवटी अभ्यासाअंती जाहीर केलं होतं की मानवी संसर्गामुळे वुहानमध्ये आढळण्याआधी हा विषाणू पसरला असावा. चीनमधल्या सुरुवातीच्या करोना विषाणूच्या जनुकांच्या संरचनेतला जो भाग काढून टाकण्यात आला होता, तो काही अभ्यासकांनी परत मिळवला. या मिळालेल्या माहितीनुसार हे लक्षात आलं की, वुहानच्या बाजारात आढळलेले विषाणूचे नमुने हे प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत. कारण हे नमुने त्या विषाणूचं सुधारित रुप होतं जो विषाणू वुहानच्या आधीच चीनमध्ये पसरला होता. काही संशोधक असंही म्हणत आहेत की करोना विषाणूचं उगमस्थान लपवण्यासाठी चीनने मूळ विषाणूच्या जनुकीय संरचनेतला काही भाग काढून टाकला.

हेही वाचा- लस घेतल्यानंतरही करोना झाला तर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी – ICMR

ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार हे आढळून आलं आहे की SARS-CoV-2 ह्या करोनाच्या विषाणूची लागण इतर कोणत्याही जीवापेक्षा जास्त वेगाने माणसाला होते. त्यामुळे त्याचा उगम झाल्या-झाल्या त्याची लागण आधी माणसांनाच झालेली असणार. असंही म्हणता येईल की माणसाहून अधिक शक्तिशाली असलेल्या कुठल्यातरी अज्ञात प्राण्याला या विषाणूची लागण झाली असावी आणि म्हणून विषाणूचा प्रसार झाला. पण म्हणून हा विषाणू प्रयोगशाळेतून आलेला आहे हे गृहितक नाकारता येणार नाही.

हे संशोधक पुढे म्हणतात की, आधीचे विषाणूही माणसावर अधिक परिणाम करायचे. मात्र याचा अर्थ असा नाही की ते मानवानेच तयार केलेले होते. त्यामुळे सध्या ह्या अनुमानांबद्दल साशंकता आहे. अजूनही करोना विषाणूच्या उगमासाठी अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे.