वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील ऐतिहासिक महाभियोग सुनावणी मंगळवारी सुरू झाली त्याच्या पहिल्याच दिवशी सिनेटमधील रिपब्लिकन सदस्य पुरावे व साक्षीदार वगळून या सगळ्या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप  डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी संतप्तपणे केला.  त्यात आरोप-प्रत्योरांपाच्या फैरी झडल्या.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दहा महिने उरलेले असताना तेथे हे राजकीय नाटय़ सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प हे सध्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीसाठी दावोस येथे गेले आहेत.

अध्यक्ष ट्रम्प यांचे निकटवर्ती असलेले मिच मॅकोनेल यांनी या सुनावणीचे नियम मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात साक्षीदारांना बोलावण्याची व पुरावे उपस्थित करण्याची कुठलीही गरज नाही असे म्हटले होते. त्यामुळे डेमोक्रॅटिक सदस्य भडकले.

मॅकोनेल हे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे असून तेथे त्यांचे बहुमत आहे. रिपब्लिकनांचे ५३ ,तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ४७ सदस्य आहेत. त्यामुळे सुनावणीचे नियम हे आम्ही ठरवू तेच असतील, असे मॅकोनेल यांनी सांगितले. डेमोक्रॅटिक पक्षाने नियमात बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होऊ  देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले,की सुनावणीचे जे नियम व प्रक्रिया आम्ही ठरवली आहे ती न्याय्य व सर्वाना समान संधी देणारी आहे.

ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग कारवाईत अभियोक्ता पक्षाचे प्रमुख असलेले अ‍ॅडम शिफ यांनी मॅकोनेल यांना प्रतिवाद करताना सांगितले,की रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांच्या महाभियोगाच्या सुनावणीचे जे नियम ठरवले आहेत त्याला काही अर्थ नाही. यात पुरावे मांडले जाऊ  नयेत, त्याचा विचार होऊ  नये व ट्रम्प हे निर्दोष ठरवले जावेत एवढाच एक हेतू ठेवण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालून जितकी जास्तीत जास्त लवकर त्यांची महाभियोगातून मुक्तता करता येईल तेवढी करण्याचा चंगच मॅकोनेल यांनी बांधलेला दिसतो. पुराव्यशिवाय सुनावणीचा ह प्रकार असून त्याला काही अर्थ नाही. ही योग्य व न्याय्य सुनावणी आहे यावर आता अमेरिकी लोकांचा विश्वास राहणार नाही.

ट्रम्प यांच्यावर १८ डिसेंबर रोजी महाभियोग कारवाई सुरू करण्यात आली. त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिनिधिगृहात सुनावणी करण्यात आली. आता महाभियोगाची अंतिम सुनावणी सिनेटमध्ये सुरू झाली आहे. अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वी अमेरिकी अध्यक्ष क्लिंटन यांच्यावर १९९९ मध्ये मोनिका लेवेन्स्की प्रकरणात महाभियोग दाखल करण्यात आला होता, त्यात ते सुटले होते.१८६८ मध्ये अँड्रय़ू जॉन्सन यांच्यावर महाभियोग कारवाई करण्यात आली होती.

डेमोक्रॅटिक पक्षाचा आक्रमक पवित्रा पाहून मॅकोनेल यांनी महाभियोग सुनावणी नियम व प्रक्रियेचा मसुदा शेवटच्या क्षणी काही प्रमाणात बदलला. त्यात प्रत्येक बाजूला युक्तिवादासाठी २४ तास देऊ न  दोन दिवसांऐवजी तीन दिवस सुनावणी घेण्याचे मान्य करण्यात आले. आधी दिवसाला बारा तास सुनावणी घेऊ न दोन दिवसात महाभियोगाचे कामकाज गुंडाळण्याचे त्यांनी ठरवले होते.  महाभियोगात डेमोक्रॅटिक पक्षाकडून सगळे व्यवस्थापन करणाऱ्यांना ट्रम्प यांच्या विरोधात पुरावे मांडू देण्याची तयारी ही रिपब्लिकनांनी दशर्वली आहे. पण ते पुरावे प्रतिनिधिगृहात मांडले होते तेच असावेत असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या गैरकृत्यांबाबतचा तपशील मांडण्यासाठी साक्षीदारांना सिनेटसमोर पाचारण करण्यास मॅकोनेल यांनी नकार दिला आहे.