पाकिस्तानातील पंजाब असेंब्लीमध्ये १६ वर्षांनंतर एका हिंदू लोकप्रतिनिधीचा प्रवेश झाला आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर १९४७ मध्ये प्रथम एका शीख लोकप्रतिनिधीचा असेंब्लीत प्रवेश झाला होता.
पंजाब प्रांतिक असेंब्लीमध्ये कानजी राम हा दुसरा हिंदू लोकप्रतिनिधी निवडून आला आहे. त्यापूर्वी १९९७ मध्ये सेठ भरत राम हे निवडून आले होते. कानजी राम आणि शीख लोकप्रतिनिधी सरदार रमेशसिंग अरोरा यांना पीएमएल-एन पक्षाने पंजाब असेंब्लीतील बिगर मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागांवर नामनियुक्त केले होते.
कानजी राम हे रहीम यार खान जिल्ह्य़ातील सादिकाबाद येथील रहिवासी असून अरोरा हे सीमेजवळील नरोवाल जिल्ह्य़ातील आहेत. असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनात अरोरा यांनी १ जून रोजी शपथ घेतली होती, तर कानजी राम १७ जून रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शपथ घेणार आहेत.
रहीम यार खान जिल्ह्य़ात हिंदूंची संख्या लक्षणीय असून आपली लोकप्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने हिंदूंना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडणे आपल्याला शक्य होईल, असे कानजी राम म्हणाले. भारतासमवेत व्हिसाचे धोरण अधिक सुलभ करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पाकिस्तानातील हिंदूंना शेजारील देशांशी विशेषत: भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे, कारण भारत हा या प्रदेशातील एक महत्त्वाचा देश आहे. भारत आणि पाकिस्तानात प्रवास करणे विशेषत: व्यापार आणि धार्मिक कार्यासाठी अधिकाधिक सुलभ व्हावे, अशी कानजी राम यांची इच्छा आहे.
जबरदस्तीने करण्यात येणारे विवाह आणि अल्पसंख्य हिंदूंचे विशेषत: महिलांचे इस्लाम धर्मात करण्यात येणारे धर्मातर याबाबत कानजी राम यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हिंदूंना विवाहाची नोंदणी करण्यातही अनेक अडचणी येत आहेत. कारण येथे त्याबाबतचा कायदाच नाही, असेही कानजी राम म्हणाले.
या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पंजाब असेंब्ली हे उत्तम व्यासपीठ आहे, असेही कानजी राम म्हणाले. कानजी राम आणि अरोरा हे लोकप्रतिनिधी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट जाणवत होता. आपण आणि आपल्या समाजासाठी हा मोठा सन्मान असल्याचे कानजी राम म्हणाले. पंजाब असेंब्लीमध्ये बिगर मुस्लीम समाजासाठी आठ जागा असून, त्यांचे वाटप राजकीय पक्षांना त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीनुसार केले जाते.