पॅरिस : विश्वातील कृष्णविवराची पहिली प्रतिमा मिळवण्यात वैज्ञानिकांना यश आले असून गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांच्या सहकार्यातून साकार झालेली ही अजोड कामगिरी आहे. काळसर गाभा असलेल्या या कृष्णविवराभोवती पांढऱ्या तप्त वायूची नारिंगी ज्वाला व आयनद्रायु (प्लाझ्मा) त्या प्रतिमेत दिसत आहे. कृष्णविवर दिसतच नाही तर त्याची प्रतिमा कुठून असणार अशा परिस्थितीत दुर्बिणींच्या माध्यमातून डिजिटल सादृशीकरण तंत्राने रेडिओ लहरींच्या मदतीने ही प्रतिमा तयार करण्याची कामगिरी साध्य करण्यात आली आहे.

एकाच वेळी ब्रुसेल्स, सँटियागो, तैपेई, टोकियो, वॉशिंग्टन या शहरातील वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. प्रतिमांकित कृ ष्णविवराचे नाव गॅरांगटुआ (महाकाय) असे असून ते मेसियर ८७ (एम-८७) नावाच्या दीíघकेत आहे.

ही प्रतिमा काही कलाकारांनी काही दशके खपून तयार केलेल्या चित्राइतकी विलोभनीय आहे. अठराव्या शतकापासून वैज्ञानिकांना कृष्णविवरांचे गूढ वाटत होते; पण त्यांचा दुबिर्णीच्या माध्यमातून माग काढण्यात आला नव्हता. आता ज्या कृष्णविवराचे छायाचित्र घेण्यात आले आहे, त्यात पन्नास दुर्बिणींच्या निरीक्षणांचा सहभाग आहे. एम-८७ या दीर्घिकेतील पृथ्वीपासून ५कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराची छबी रेडिओ दुर्बिणींनी टिपली आहे. त्याचे आपल्यापासूनचे अंतर खरेतर अकल्पित आहे, असे फ्रान्सच्या नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्चचे खगोलशास्त्रज्ञ फ्रेडरिक ग्वेथ यांनी सांगितले.

इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप या दुर्बिणीने आपल्याच आकाशगंगेतील सॅगॅटॅरियस-ए या कृष्णविवराचे छायाचित्र घेतल्याचा अंदाज होता. पण, ते पृथ्वीपासून २६ हजार प्रकाशवर्षे दूर आहे. युरोपीय अवकाश संस्थेचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ पॉल मॅकनमारा यांनी एम-८७ मधील कृष्णविवराचे छायाचित्र काढणे म्हणजे चंद्रावरील गोटीचे पृथ्वीवरून छायाचित्र काढण्यासारखे आहे असे म्हटले आहे. आपल्याच वजनाने कोसळेल अशी मोठी दुर्बीण न उभारता वेगवेगळ्या दुर्बिणींच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले आहे, असे ग्रेनोबल येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मेलिमेट्रिक रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे खगोलवैज्ञानिक मायकेल ब्रेमर यांनी सांगितले.

एप्रिल २०१७ पासून अनेक दुर्बिणी यावर काम करीत होत्या. त्यात हवाई, अ‍ॅरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली व दक्षिण ध्रुव येथील दुर्बिणींनी सॅग-ए व एम- ८७ यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. या सर्व दुर्बिणी एक त्र केल्या तर त्यांचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाइतका होतो.  एम- ८७ मधील कृष्णविवर हे जास्त छायाचित्र योग्य होते. ‘सॅग ए’जास्त क्रियाशील असल्याने त्याचे स्पष्ट छायाचित्र मिळवणे अवघड होते.

कृष्णविवर आणि प्रयोगासंबंधी..

* कृष्णविवराची प्रतिमा आतापर्यंत अनेक दुर्बिणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली असून असा प्रयत्न कधीच केला गेला नव्हता. गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर ही महत्त्वाची कामगिरी आहे.

* प्रयोगात २०० तज्ज्ञ व ६० संस्था सहभागी.

* कृष्णविवराचे डिजिटल सादृशीकरण करण्याची संकल्पना प्रथम जिन पिअर ल्युमिनेट यांनी मांडली होती. पण त्यानंतर इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप प्रयोगाची प्रत्यक्ष कल्पना नेदरलँडस येथील रॅडबाऊंड विद्यापीठाचे प्रा. हिनो फॅल्क यांनी मांडली.

* कृष्णविवर हा शब्द अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ जॉन व्हिलर यांनी प्रथम वापरला.

* अवकाशातील ज्या बिंदूवर द्रव्य खूप संप्रेषित होऊन ज्यातून प्रकाश कधीच बाहेर पडू शकणार नाही, अशी स्थिती बनते त्याला कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवराचे वस्तुमान जितके जास्त तितके ते मोठे असते. असे संप्रेषण केले तर पृथ्वी शिंप्याच्या बोटांना असलेल्या धातूच्या टोपीत बसू शकेल व सूर्य केवळ सहा किलोमीटरचा शिल्लक राहील. कृष्णविवरापलीकडे जेथून कुठलीही वस्तू परत येत नाही असा जो भाग असतो त्याला इव्हेन्ट होरायझन म्हणतात.

* यात कृष्णविवराचे छायाचित्र घेतले, असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात  दुर्बिणींनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे अनेक तुकडे जोडून डिजिटल सादृशीकरणाने त्याची प्रतिमा मिळवण्यात आली आहे.

* प्रत्येक चमूने मिळवलेली प्रतिमा ही सारखीच असून त्यात काळा  गाभा व त्याभोवती नारिंगी लालसर रंगाची प्रभामंडल दिसत आहे. एम- ८७ या दीर्घिकेतील कृष्णविवराची ती प्रतिमा असून हे कृष्णविवर पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचा व्यास ४० अब्ज किलोमीटर असून आकार पृथ्वीच्या ३० लाख पट आहे.