पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी भाजपने शनिवारी जाहीर केली. सुवेंदु अधिकारी यांना त्यांच्या नंदीग्राम या गृह मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा भाजप उमेदवारांत समावेश असून, एजेएसयू या सहयोगी पक्षासाठी एक जागा सोडण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यांत मतदान होत असलेल्या ६० जागांपैकी ३ जागा सोडून इतर सर्व जागांवरील उमेदवारांची भाजपने घोषणा केली आहे.
नंदीग्राममध्ये सुवेंदु विरुद्ध ममता
अलीकडेच भाजपमध्ये आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदु अधिकारी यांना नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध उतरवण्याची घोषणा पक्षाने शनिवारी केली. नंदीग्राममधील भूसंपादनाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या ताकदीवर ममता यांनी २०११ साली राज्यातील सत्ता हस्तगत केली होती आणि त्यांचे निकटचे सहकारी असलेले सुवेंदु हे येथील आंदोलनाचा चेहरा होते. यामुळे या दोघांची लढत ही आगामी विधानसभा निवडणुकांतील सर्वात प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2021 1:00 am