राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत मतदारसंघनिहाय संभाव्य उमेदवारांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. पुढील बैठक ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सहमती झालेली आहे. प्रत्येक १०६ मतदारसंघांचे पक्षीय वाटप झाले आहे. त्यामुळे २१२ जागा निश्चित झाल्या असून ४०-४२ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. उर्वरित जागा ४४-४६ जागांबाबत योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

या जागांबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरच पक्षीय उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी सहा सदस्यांची छाननी समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिाकार्जुन खरगे आदी सहा सदस्यांची नावे जाहीर झाली होती. त्यात वडेट्टीवार यांचा समावेश केलेला नव्हता. मात्र पक्षाध्यक्षांच्या आदेशानंतर वडेट्टीवार यांनीही समितीत सहभागी करून घेण्यात आले आहे.

वंचित आघाडीशी चर्चा निष्फळ

छाननी समितीच्या बैठकीत मित्रपक्षांबाबतही चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी सहमती होण्याची शक्यता धुसर झाली आहे. आंबेडकर यांनाच आघाडी करण्यात स्वारस्य नाही. कडुलिंबाच्या पाल्यात कितीही साखर घातली तरी चव कडूच लागते. आंबेडकर सातत्याने कोणती ना कोणती कारणे पुढे करत आहेत. त्यांच्या डोक्यात कडूपणा असेल तर काँग्रेस काही करू शकत नाही. कधी म्हणतात काँग्रेसला ४० जागा देतो, कधी म्हणतात १४४ जागा देतो. कधी म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करतो. ते आता म्हणतात की, आघाडीने आंबेडकरांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावे. आंबेडकर वारंवार भूमिका बदलत असतील तर आघाडी होऊ शकत नाही, अशी वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत लवचिकता

लोकसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्यास काँग्रेस फारसा उत्सुक नव्हते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेल्यानंतर पक्षाने मनसेबाबत लवचीक भूमिका घेतली आहे. मायावती आणि मुलायम सिंह यांच्या पक्षात युती झाली. लोकसभा निवडणुकीवेळी परिस्थिती वेगळी होती. दोघांची गरज असेल तर दुसऱ्यांदा मुलगी बघून लग्न होऊ शकते, पण मनसेचाही प्रस्ताव यायला हवा, असे मत वडेट्टीवार यांनी मांडले.