२०१९ हे वर्ष अवकाशप्रेमींसाठी खास असेल असे म्हटले जात होते. या वर्षात एकूण ५ ग्रहणे असतील. यात ३ सूर्यग्रहणे तर २ चंद्रग्रहणे असतील. यातील पहिले चंद्रग्रहण २१ जानेवारी रोजी सोमवारी आहे. ६ जानेवारी रोजी पहिले सूर्यग्रहण पार पडले त्यानंतर आता हे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल. मात्र हे ग्रहण आफ्रीका, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका याठिकाणी दिसणार आहे.

या ग्रहणाला ब्लड मून असे म्हणण्यात आले असून त्याचा भारतीय हवामान आणि वातावरणावर परिणाम होणार आहे. या ग्रहणामुळे देशातील थंडी वाढणार असून उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. याआधी अशाप्रकारचे पूर्ण चंद्रग्रहण १७०० वर्षांपूर्वी पडले होते. ग्रहणकाळात काही गोष्टी करु नयेत असा समज भारतीयांमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण २० जानेवारी रोजी सकाळपासून २१ जानेवारीच्या पहाटे ३.३० पर्यंत दिसणार आहे.

२ आणि ३ जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या १६ आणि १७ तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी २ तास ५८ मिनिटे इतका असेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबतच आशिया खंडातही दिसणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हे ग्रहण पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. तर २६ डिसेंबर रोजी २०१९ मधील शेवटचे ग्रहण असेल. हे वर्तुळाकार सूर्यग्रहण भारतात दिसेल. देशाच्या दक्षिण भागातून हे ग्रहण जास्त चांगले दिसू शकणार आहे.