News Flash

चीनचं टेन्शन वाढणार? १२ मार्चला QUAD देशांची पहिली बैठक, मोदी-बायडेन होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च रोजी होणाऱ्या क्वाड (QUAD) देशांच्या प्रमुखांच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च रोजी होणाऱ्या क्वाड (QUAD) देशांच्या प्रमुखांच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली. ही बैठक ऑनलाइन पद्धतीने होईल, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून जो बायडेन आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच बैठक असेल. यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकीनंतर दोघांची फोनवर चर्चा झाली होती.

चार देशांच्या क्वाड (QUAD) या संघटनेत भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाही सदस्य आहेत. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हेही या समारंभात सहभागी होतील. चार देशांमधील ही पहिली बैठक आहे.

या बैठकीत चारही नेते आपल्या स्थानिक मुद्यांसोबतच काही जागतिक समस्यांवरही चर्चा करतील. करोना महामारीपासून जलवायु परिवर्तन यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. चारही देशांचे नेते प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर समान हितसंबंधांसह चर्चा करतील. हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात स्वतंत्र, अखंडित आणि सर्व जहाजांच्या वाहतुकीवर विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत. चारही देश कोविड -१९ च्या संसर्गावर चर्चा करतील. तसेच हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात लसीची सुरक्षा, एकसमान आणि परवडणारी लस यावर चर्चा करतील. करोनावरील चर्चेदरम्यान चीनचा मुद्दा उपस्थित होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांनी करोनाच्या संसर्गासाठी चीनला जबाबदार धरत चीनच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे यावेळी चीनविरोधात काही भूमिका घेतली जाते का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

QUAD या संघटनेत भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश सदस्य असून हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता कायम रहावी आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये हे क्वाडचं लक्ष्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 10:23 am

Web Title: first quad summit on 12th march india us japan australia leaders talks on friday sas 89
Next Stories
1 मेगन मर्केलच्या गंभीर आरोपांवर अखेर ब्रिटीश राजघराण्याने सोडलं मौन; म्हणाले…
2 ब्रिटनच्या संसदेतील चर्चेबाबत भारताचा आक्षेप
3 संसदेत इंधनभडका!
Just Now!
X