मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले असून, हंगामी अध्यक्ष ग्यानसिंग यांनी नव्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, काँग्रेस पक्षात नेत्याच्या नावाबद्दल सुंदोपसुंदी सुरू असल्याने अधिवेशन सुरू होऊनही विरोधी पक्ष नेत्याची निवड होऊ शकली नव्हती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ सदस्य सत्यदेव कटारे यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड जाहीर केली.
कटारे यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आल्याने तेच विरोधी पक्षनेते होणार आहेत. त्याचप्रमाणे राजेंद्र सिंग यांचे नाव विधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले.मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले असून, भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी सीताशरण शर्मा यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तर उपाध्यक्षपद परंपरेनुसार विरोधी पक्षाला देण्यात आले असून या दोन्ही पदांची निवड एकमताने होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.