पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील एक व्हिडीओ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान कारमध्ये बसल्या बसल्या पहिल्यांदा कोणती गोष्ट करतात या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

एका मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये दोन वेगवेगळ्या प्रसंगाचे व्हिडीओ एकत्र करुन पंतप्रधान मोदी कारमध्ये बसल्या बसल्या सर्वात आधी सीट बेल्ट बांधतात असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पुढे या ट्विटमध्ये कारमध्ये बसल्यावर सीट बेल्ट बांधा असेही सांगण्यात आले आहे. तसेच पंतप्रधानही कारमध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावतात मग तुम्ही का नाही अशा उद्देशाने सीट बेल्ट न बांधण्यासाठी तुमच्याकडे काय कारण आहे असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

भारत सरकारच्या सडक सुरक्षा जीवन रक्षा या रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत हा व्हिडीओ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ट्विट केला आहे. यामध्ये #SadakSurakshaJeevanRaksha आणि #RoadSafety हे दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. तसेच रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच अभिनेता अक्षय कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते आणि महामार्ग मंत्री मनसुख मांडवीया यांच्या ट्विटर अकाऊण्टला टॅग करण्यात आले आहे. हजारो ट्विपल्सने हा व्हिडीओ लाईक केला असून पंतप्रधानांची ही सवय अगदी अनुकरण करण्यासारखी असल्याचे मत मांडले आहे.

काही दिवसांपूर्वीच स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून अगदी आगळ्या वेगळ्याप्रकारे सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियानासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केले होते.

तरुणाईच्याच भाषेत तरुणाईला रस्त्यांवर गाडी चालवताना नियमांचे पालन करण्यासाठी अक्षयने ट्रॅफिक हवालादाराची भूमिका केलेले या व्हिडीओंची चांगलीच चर्चा सोशल मिडियावर रंगली होती.