श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही असं म्हटलं जातं. मात्र चीनमधील एका व्यक्तीला अंधश्रद्धेमुळे चक्क १२ लाखांचा फटका बसला आहे. येथील अनहुई प्रांतामधील अंकिंग प्रदेशात २८ वर्षीय व्यक्तीला विमान कंपनीने एक लाख २० हजार युआनचा (१२ लाख ३६ हजार रुपये) दंड करण्यात आला आहे. ही व्यक्ती विमानाने पहिल्यांदा उड्डाण करत असल्याने तिने प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून चक्क विमानाच्या इंजिनमध्ये नाणी टाकल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

चीनमधील यिशो जिल्ह्यातील न्यायलयाने संबंधित प्रवाशाला मागील वर्षी जुलै महिन्यात सुनावणी झालेल्या प्रकरणामध्ये दंड सुनावला होता. मात्र यासंदर्भातील माहिती आत्ता उघड करण्यात आली आहे. न्यायलयाने आपल्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकरण समोर आले आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव लू चाओ असं असून त्याने विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकल्याची कबुली दिली आहे. टीएनझ्यूशॅन विमानतळावर विमानात बसल्यानंतर आपण हे कृत्य केल्याचे चाओने मान्य केलं.

नक्की काय घडलं होतं?

लू चाओ २०१९ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्यासाठी टीएनझ्यूशॅन विमानतळावर दाखल झाला. तो विमानात बसला. त्यानंतर विमान उड्डाण करण्याच्याआधी विमान कंपनीच्या कर्चमाऱ्याला विमानाच्या इंजिनजवळ जमीनीवर एक युआनचं नाणं अढळल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलं. विमानाच्या इंजिनमध्ये नाणी अढळून आल्याने विमान उडू शकणार नाही हे स्पष्ट झालं. कंपनीने दुसऱ्या विमानाची सोय करुन अडकेलल्या प्रवाशांना पाठवून दिले. यामुळे कंपनीला १ लाख २३ हजार युआनचा म्हणजेच १३ लाख रुपयांच्या आसपास तोटा झाला, असं ‘द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

न्यायालयात केला अजब युक्तीवाद

त्यानंतर दहा दिवसांनी पोलिसांनी लू चाओला अटक केली. चौकशी दरम्यान लू याने आपणच इंजिनमध्ये नाणी टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर लू विरोधात कंपनीने खटला दाखल केला. यामध्ये लू याने कंपनीला झालेल्या खर्च भरुन द्यावा अशी मागणी केली होती. “इंजिनमध्ये नाणी फेकू नका असं विमान कंपनीने प्रवाशांना सांगणं अपेक्षित आहे,” असा युक्तीवाद लू याने न्यायलयामध्ये केला. मात्र त्याचे कोणतेच म्हणणे ऐकून न घेता कोर्टाने त्याला दंड सुनावला आहे. ही दंडाची रक्कम त्याला कंपनीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता हा दंड भरण्याशिवाय लूकडे कोणताच पर्याय उपलब्ध नाही.