मुंबई, ठाण्यातही रुग्ण; राज्यातील संख्या १४ वर

चीनसह जगभर थमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही करोनाचा रुग्ण आढळला आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १४ वर पोहोचली.

सौदी अरेबियाहून परतलेल्या ७६ वर्षीय वृद्धावर कर्नाटकातील कलबुर्गी येथे उपचार सुरू होते. त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय होता. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती, असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी गुरुवारी सांगितले.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येतही वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यापाठोपाठ गुरुवारी रात्री मुंबई आणि ठाण्यातही प्रत्येकी एक रुग्ण आढळला. ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून परतला होता. मुंबईत आढळलेला रुग्ण दुबईहून परतलेला आहे. ही व्यक्ती वयोवृद्ध असून, प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा अहवाल आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत ३९६ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी १४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीन, इराण, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी या सात देशांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस देखरेखीत ठेवा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी आपापल्या भागासाठी कृती आराखडा तयार करून तो शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्य सचिवांना सादर करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. जनतेने घाबरण्याचे कारण नाही. मास्क लावून फिरण्याची गरज नाही. केवळ गर्दीची ठिकाणे टाळावीत आणि ठराविक वेळेनंतर साबणाने हात धुऊन स्वच्छता ठेवावी, असे आवाहन टोपे यांनी केले.

करोनाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाल्याचे समजते. आयपीएल सामन्यांत प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असेल तर त्यास परवानगी देणे सध्याच्या परिस्थितीत साफ चुकीचे ठरेल, यावर मंत्रिमंडळात सहमती झाली. पण त्याचवेळी प्रेक्षकांविना सामने होणार असतील व केवळ वाहिन्यांवर दाखवले जाणार असतील तर त्याबाबत संबंधितांचा प्रस्ताव आल्यावर निर्णय घेता येईल, असेही ठरले आहे.

क्रीडा स्पर्धावर प्रेक्षकबंदी

नवी दिल्ली : करोना विषाणूमुळे केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर देशभरातील क्रीडा स्पर्धामध्ये प्रेक्षकबंदी घालण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटसहित (आयपीएल) अनेक महत्त्वाच्या स्पर्धाना प्रेक्षकबंदीचा फटका बसणार आहे. प्रवास र्निबधांमुळे परदेशी खेळाडूंनी १५ एप्रिलपर्यंत ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे. त्याचबरोबर २४ मार्चपासून सुरू होणारी इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येणार आहे. सविस्तर/क्रीडा

राज्यातील रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता कमी

महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे कमी प्रमाणात जाणवत असून, आजाराची तीव्रता कमी आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या १९० पैकी १८८ जणांना करोना नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.

देशातील रुग्णसंख्या ७४

देशातील करोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. करोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही, पण काळजी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. मात्र, करोनाच्या धास्तीने दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केला. दिल्लीतील प्राथमिक शाळा याआधीच बंद करण्यात आल्या आहेत.