करोना, लॉकडाउन, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) जारी करण्यात आलेली जीडीपीसंदर्भातील आकडेवारी यापाठोपाठ आता देशाच्या चिंतेत भर टाकणारी आणखीन एक अहवाल समोर आला आहे. जागतिक पतमानांकन संस्था असणाऱ्या ‘फिच रेटिंग्स’ने भारतासमोरील आर्थिक संकट पुढील काही काळ कायम राहणार असल्याचं सांगत चालू आर्थिक वर्षामधील अर्थव्यवस्थेचा दर नाकारात्मक राहील असं म्हटलं आहे. ‘फिच’ने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये १०.५ टक्क्यांची घट दिसून येईल असं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसल्याचे एनएसओने मागील आठवड्यामध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आलं होतं.  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र दिसत असून सध्या सुरु असणाऱ्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यातच आता ‘फिच’च्या अहवालाने आर्थिक संकटासंदर्भातील सरकारची आणि भारतीयांची चिंता आणखीन वाढवली आहे.

“भारताचा जीडीपी २०२० च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) उसळी घेईल. अनेक व्यवहार सुरळीत होण्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल पहायाला मिळेल. मात्र सध्याच्या आर्थिक संकटामधून फटक्यामधून सावरताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा संथ आणि असमान राहील अशी चिन्ह दिसत आहेत,” असं फिचने अहवालामध्ये नमूद केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. “भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत राहील असा आमचा अंदाज आहे. ग्लोबल इकनॉमिक आऊटलूकने जूनमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा पाच टक्क्यांनी अधिक घट दिसून येणार आहे,” असंही फिचने म्हटलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी पाच टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज यापूर्वी फिचने व्यक्त केला होता. मात्र आता हा थेट दुप्पटीने कमी होणार असल्याचे नवीन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

समजून घ्या : >> GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्याशी संबंध कसा?

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, एनएसओने जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं होतं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. त्यातच आता पुढील वाटचालही अधिक बिकट असल्याचे चित्र फिचच्या अहवालामधून दिसून येत आहे.

जपानच्या अर्थव्यवस्थेलाही फटका

जपानच्या अर्थव्यस्थेमध्येही एप्रिल-जूनच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी घट झाल्याचे पहायाला मिळालं आहे. जपानी अर्थव्यवस्थेला अपेक्षेपेक्षा अधिक मोठा फटका बसल्याचे दिसून आलं आहे. मंगळावारी जपानने दिलेल्या माहितीनुसार अर्थव्यवस्थेचा विकासदर नकारात्मक असून देशाचा जीडीपी २८.१ टक्क्यांनी पडला आहे. मागील महिन्यात जपानचा जीडीपी २७.८ टक्क्यांपर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सध्या समोर आलेली आकडेवारी ही जपानच्या आर्थिक विकासासाठी जास्त धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.

समजून घ्या : >> अर्थव्यवस्था म्हणजे काय? आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते?

करोना लॉकडाउनमुळे जपानमधील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. देशातील अनेक भागांमधील दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा बंद आहेत. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने निर्यातीवर भर देणारी अर्थव्यवस्था असलेल्या जपानला करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा मोठा फटका बसला आहे.