अरुणाचल प्रदेशातील पाच अपहृत तरुणांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अखेर शनिवारी मुक्त केले. अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्य़ात मॅकमोहन रेषेनजिक चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) २ सप्टेंबरला पाच तरुणांचे अपहरण केले होते. त्यांची शनिवारी सुमारे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या अंजॉ जिल्ह्य़ात मुक्तता केली. तानु बाकर, प्रसाद रिंगलिंग, गारू दिली, दोंगतु एबिया आणि तोक सिंगकाम या पाच जणांना चिनी लष्कराने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले, अशी माहिती संरक्षण विभागाचे तेजपूर येथील प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिली. या पाचही जणांना करोना निर्बंधांनुसार १४ दिवसांकरिता विलगीकरणात ठेवले जाईल. त्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या हवाली केले जाईल, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या युवकांची सुरक्षित सुटका सुनिश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवर भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काय घडले होते ? अरुणाचलमधील अप्पर सुबनसिरी जिल्ह्य़ातील सात तरुण गेल्या २ सप्टेंबरला शिकारीसाठी गेले होते. त्यापैकी पाच युवकांना नाचोच्या १२ किलोमीटर उत्तरेला असलेल्या सेरा-७ या लष्करी गस्तीक्षेत्रातून चिनी लष्कराने ताब्यात घेतले होते. भारतीय लष्करासाठी हमाल म्हणून काम करणारे हे तरुण बेपत्ता झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी समाजमाध्यमांवर जाहीर केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले.