दहशतवाद्यांविरुद्ध हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत इंडोनेशियाच्या पूर्वेकडील भागात दहशतवाद्यांच्या छावण्यांवर केलेल्या हल्ल्यात पाच संशयित दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पश्चिम नुसा टेंगारा प्रांतातील दोन स्वतंत्र प्रशिक्षण छावण्यांवर शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी छापे टाकण्यात आले. दहशतवाद्यांकडे स्फोटक सामुग्री असल्याने पोलिसांना गोळीबार करणे भाग पडले, असे पोलिसांचे प्रवक्ते बॉय राफली अमर यांनी सांगितले.
सदर ठिकाणी बॉम्ब तयार करण्यात येत असत आणि त्यासाठी लागणारी नायट्रेट युरिया पावडर, बॅटरी असे घटक आणि पाच पाइपबॉम्ब हस्तगत करण्यात आले.
देशातील मोस्ट वॉण्टेड संशयित दहशतवादी संतोषो हा या गटाचा नेता असून तो सुरक्षा रक्षकांवर हल्ले करण्यासाठी युवकांच्या गटांना दहशतवादी प्रशिक्षण देत आहे, असे पोलिसांनी सांगितले.