नारद हा प्राचीन काळातील गुगलचं होता. गुगलप्रमाणेच प्राचीन काळात नारद सर्व गोष्टींची माहिती ठेवत असेस असं वक्तव्य नुकतंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात, असं धक्कादायक किंवा खरंतर विचित्र विधानं करण्याची राजकारण्यांची जणू अहमहमिका लागली आहे. यामध्ये भाजपाचे मंत्र आघाडीवर असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्या सत्ताकाळामध्ये विचित्र वक्तव्ये केली होती.

भारतात लोकसंख्यावाढीचा स्फोट होत असून ती आटोक्यात आणायला हवी अशी चर्चा वरचेवर होत असते. काँग्रेस सत्तेत असताना आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री असलेल्या गुलाम नबी आझादांनी यावर जालीम उपाय सुचवताना घराघरात वीज देण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. आझाद यांनी दावा केला की घराघरात वीज आली की सेक्स करण्यापेक्षा जास्त वेळ लोक टिव्ही बघतिल व लोकसंख्या आटोक्यात राहील. टिव्हीच्या नादात त्यांना सेक्स करायला व मुलं जन्माला घालायला सवडच मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर नुकतंच असंच एक भारी उद्गार त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी काढले आहेत. महाभारताच्या काळात इंटरनेट व सॅटेलाइट कम्युनिकेशन होतं असा जावईशोध त्यांनी लावला आहे.

हिंदू धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेल्या साक्षी महाराजांनी तर हिंदू धर्मासाठी हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा, असा अजब सल्ला दिला आहे. भाजपाच्याच खासदार तरूण विजय यांनी भारतात वंशभेदाला थारा नाही, हे सिद्ध करण्यासाठी जे उदाहरण दिलंय ते तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. विजय म्हणाले की भारतीय लोक दक्षिणेतल्या वर्णानं काळ्या असलेल्या लोकांबरोबर राहतात, यावरूनच सिद्ध होतं की भारतीय वंशभेद करणारे नाहीत.