फोर्बसच्या जगातील अब्जाधीश महिलांच्या यादीत भारतातील पाच महिलांचा समावेश असून यंदाच्या वर्षी हा विक्रम झाला आहे. एकूण यादीतील संख्येत महिलांची संख्या ही ११ टक्के आहे.
यादीत पहिल्या तीन क्रमांकात अनुक्रमे ख्रिस्ती वॉल्टन, लिलियन बेटनकोर्ट, अलाइस वॉल्टन यांचा समावेश आहे. १९७ पैकी केवळ २९ महिला स्वबळावर अब्जाधीश झालेल्या आहेत. अब्जाधीशांच्या यादीत भारताचे ९० जण असून त्यांची मालमत्ता २९५ अब्ज डॉलर आहे. भारतीयात पहिला क्रमांक मुकेश अंबानी यांचा असून त्यांची मालमत्ता २१ अब्ज डॉलर आहे, तर दुसरा क्रमांक औषध उद्योजक दिलीप शांघवी यांचा आहे. त्यांची मालमत्ता १० अब्ज डॉलर आहे. लक्ष्मी मित्तल पाचव्या स्थानावर गेले आहेत.
भारतीय महिलांची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे, गेल्या वर्षी ती फक्त दोन होती. जगात अब्जाधीशांच्या यादीत महिलांची संख्या जास्त आहे.
भारतीय अब्जाधीश महिलांमध्ये सावित्री जिंदाल व कुटुंबीय २८३ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता २०१५ मध्ये ५.३ अब्ज अमेरिकी डॉलर होती. २०१४ मध्ये ती ४.९ अब्ज डॉलर होती.
तीन वर्षे घसरण झाल्यानंतर सावित्री जिंदाल यांचा ओ.पी. जिंदाल समूह सावरला. बेनेट कोलमन कंपनीच्या अध्यक्षा इंदू जैन  यांची मालमत्ता ३.१ अब्ज अमेरिकी डॉलर असून त्यांचा ६०३ वा क्रमांक लागला आहे. तीन वर्षांच्या घसरणीनंतर अनू आगा यांनी पुन्हा अब्जाधीश महिलात स्थान मिळवले असून त्यांचे थरमॅक्स कंपनीत ६२ टक्के समभाग आहेत त्यामुळे त्यांचा १३१२ वा क्रमांक लागला असून त्यांची मालमत्ता १.५ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.  
इतर अब्जाधीशांमध्ये विनोद गुप्ता (१५३३) मालमत्ता १.२ अब्ज यांचा समावेश आहे. त्या किमत राय गुप्ता यांच्या पत्नी असून त्यांना यादीत प्रथमच स्थान मिळाले आहे. हावेल्स इंडियाचे समभाग ७४ टक्क्य़ांनी वाढल्याने त्यांना नफा झाला. बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांनी कर्करोग व मधुमेहावर औषधे तयार केली असून त्यांचा क्रमांक १७४१ आहे व त्यांची मालमत्ता १ अब्ज डॉलर आहे.
वॉलमार्ट रिटेलचा वारसा मिळालेल्या ख्रिस्ती वॉल्टन या सर्वात श्रीमंत असून त्यांची मालमत्ता ४१.७ अब्ज डॉलर आहे. त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. लॉरियल सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या प्रमुख वारसदार लिलियन बेटनकोर्ट या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची मालमत्ता ४०.७ अब्ज डॉलर्स आहे.
 तिसऱ्या श्रीमंत महिला वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टमन यांच्या कन्या व ख्रिस्ती वॉल्टन यांच्या नणंद अलाइस वॉल्टन या आहेत. त्यांची मालमत्ता ३९.४ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. यातील अनेक महिलांना त्यांची मालमत्ता ही वारशाने पती किंवा वडिलांकडून मिळालेली आहे.