येथील इकौनी गावात मंदिराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांत झालेल्या चकमकीत एका पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

या परिसरात राम कैलास पांडे यांच्या कुटुंबाशेजारी शिवसेवक यांचे कुटुंब राहते. शिवसेवक कुटुंबाने बांधलेल्या मंदिरावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये चकमक उडाली. जुन्या मंदिराच्या बाजूलाच नवे मंदिर बांधण्यात आले.

पांडे यांचा पुत्र सुरेश हा कानपूरस्थित पोलीस उपनिरीक्षक असून तो सुटीवर घरी आला होता. रविवारी सायंकाळी त्याचे शिवसेवक कुटुंबाशी कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा सुरेशने केलेल्या गोळीबारात शिवसेवक, त्यांचा भाऊ कृष्णसेवक आणि पुतण्या विमल जागीच ठार झाले. या प्रकाराचा राग आल्याने शिवसेवक आणि ग्रामस्थांनी पांडे पितापुत्रांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली, त्यामध्ये ते ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून दोन्ही कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.