नासाच्या हबल दुर्बिणीच्या मदतीने संशोधन

आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेला पाच लाखांहून अधिक ताऱ्यांचा समूह नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने शोधला आहे. हे तारे आकाशगंगेतील एका प्रचंड वस्तुमान व घनता असलेल्या तारकासमूहाचे भाग आहेत असे नासाने म्हटले आहे. लाखो सूर्य पृथ्वी व आपल्या जवळचा तारा अल्फा सेंटॉरी यांच्या दरम्यानच्या जागेत दाटीवाटीने बसवलेले असावेत तशी ही स्थिती आहे. आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिप्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराभोवती हा तारकासमूह फिरत आहे. त्या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या ४० लाख पट अधिक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी हबल अवरक्त किरणांचा वापर करून या तारा संकुलाच्या सभोवताली असलेल्या धुळीचा अभ्यास केला. हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्राचे रूपांतर वैज्ञानिकांनी अवरक्त प्रकाशीय चित्रातून मानवी डोळ्यांना दिसू शकणाऱ्या रंगीत छायाचित्रात केले आहे. या छायाचित्रात दाट ढग व धूळ दिसत असून ताऱ्यांच्या प्रतिमाही दिसत आहेत. यातील ढग इतके दाट आहेत की त्यांना भेदणे हबलच्या अवरक्त किरण दुर्बिणीलाही जमले नाही. हबलने गेल्या चार वर्षांत या ताऱ्यांच्या हालचाली टिपल्या असून काही मापनेही केली आहेत. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करून वैज्ञानिकांनी त्यांची रचना व वस्तुमान तसेच इतर गुणधर्माची माहिती मिळवली आहे. ही माहिती या ताऱ्यांची निर्मिती कशी झाली असावी यावर प्रकाश टाकणारी आहे. आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या चकतीसारख्या भागातून बाहेर पडणाऱ्या वायूपासून त्यांची निर्मिती झाली असावी. यातील प्रतिमा ५० प्रकाशवर्षे व्यासाची असून २०१० ते २०१४ दरम्यान एकूण नऊ वेगळ्या प्रतिमा घेण्यात आल्या आहेत. हबल दुर्बिणीच्या वाइड फिल्ड कॅमेरा ३ ने ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. आकाशगंगेचा मध्यभाग आपल्यापासून २७ हजार प्रकाशवर्षे दूर आहे व खगोलवैज्ञानिकांनी केलेल्या अंदाजानुसार या समूहात १ कोटी तारे असे आहेत की जे फिकट आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिमा घेता आलेल्या नाहीत.