गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या आनंदात पाच मंत्र्यांच्या पराभवाच्या रूपाने मिठाचा खडा पडला.
या निवडणुकीत मोदी मंत्रिमंडळातील तब्बल पाच मंत्र्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. यात तीन कॅबिनेट तर दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, काँग्रेसलाही प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया आणि विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहिल यांचा पराभव सहन करावा लागला.
मोदी मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री आणि सरकारचे प्रवक्ता जनार्दन व्यास यांचा बलवंतसिंह राजपूत यांनी २५ हजार ८२४ मतांच्या फरकाने मोठा पराभव केला. गेल्या निवडणुकीत याच सिद्धपूर विधानसभा मतदारसंघात व्यास यांनी राजपूत यांच्यावर पंचवीसशे मतांनी निसटता विजय मिळवला होता. यंदा मतदार पुनर्रचनेचा त्यांना फटका बसल्याचे दिसत आहे.
आमरेली मतदारसंघात कृषिमंत्री दिलीप संघाणी यांचा काँग्रेसचे परेश धनाणी यांनी तब्बल २९ हजार ८९३ मतांनी पराभव केला तर वडगाम मतदारसंघात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री फकीरभाई वाघेला यांना काँग्रेसच्या जेठाभाई वाघेला यांनी २२ हजार ८९३ मतांनी धूळ चारली. राज्यमंत्र्यांपैकी कृषी राज्यमंत्री कानूभाई भलाला यांचा गुजरात परिवर्तन पार्टीचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्यापुढे टिकाव लागला नाही. केशुभाईंनी भलाला यांचा ४२ हजार मतांच्या मोठय़ा फरकाने पराभव केला. वन राज्यमंत्री किरीटसिंह राणा यांना मात्र काँग्रेसच्या विद्यमान खासदार सोमा गांडा यांच्याकडून पंधराशे एकसष्ठ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
पोरबंदर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचे अर्जुन मोधवाडिया यांचे स्वप्न भंगले. मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोधवाडिया यांचा भाजपच्या बाबू बोखिरिया यांनी १७ हजार १४६ मतांनी पराभव केला. भावनगर मतदारसंघातून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहिल यांना मत्स्योद्योग राज्यमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी १८ हजार ५५४ मतांनी धूळ चारली.