उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्ह्यातील गणाई गंगोलीनजीक शरयू नदीत बुधवारी स्नानासाठी गेलेली ५ अल्पवयीन मुले बुडून मरण पावली. ही मुले एका विवाह समारंभातून परत येत असताना त्यांनी नदीत स्नान करण्याचे ठरवले. अलीकडेच पडलेल्या पावसामुळे नदीला पूर आला असल्याची त्यांना कल्पना आली नाही आणि नदीच्या वेगवान प्रवाहामुळे ती वाहून गेली, अशी माहिती गंगोलीहाटचे उपविभागीय दंडाधिकारी बी.एस. फोनिया यांनी दिली.

मरण पावलेल्या मुलांची नावे रवींद्र कुमार, सलील कुमार, मोहित, रमेश व पीयूष अशी असून ती १५ ते १६ वर्षांची होती. ही सर्व मुले कोना धौलिया खेड्यातील होती. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले.