देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती बिकट होत असून येत्या ऑक्टोबरपर्यंत किमान आणखी पाच लशींना केंद्र सरकार मान्यता देण्याची शक्यता आहे. दरम्यान रशियाच्या स्पुटनिक ५ या लशीस येत्या दहा दिवसांत मान्यता मिळणार आहे.   सध्या उपलब्ध असलेल्या लशींचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्नही सरकार करणार आहे.

भारतात सध्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनच लशी उपलब्ध असून २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत आणखी पाच लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यात स्पुटनिक ५ ही लस रेड्डीज लॅबोरेटरीजच्या मदतीने उत्पादित केली जाणार असून जॉन्सन अँड जॉन्सनची लस बायॉलॉजिकल इ ही कंपनी तयार करणार आहे. सीरम इंडिया ही कंपनी नोव्हाव्हॅक्स ही लस उत्पादित करणार आहे. झायडस कॅडिला कंपना ‘झायकोव्ह- डी ’ लस तयार करीत आहे. भारत बायोटेक नाकावाटे देण्याची लस विकसित करीत आहे.   या लशींना परवानगी देताना परिणामकारकता व सुरक्षितता या दोन घटकांवर सरकार लक्ष केंद्रित करीत आहे.

रेड्डी लॅबोरेटरीज व्यतिरिक्त हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा, विक्रो बायोटेक या  कंपन्या स्पुटनिक ५ लशीचे उत्पादन करणार असून ८५० दशलक्ष मात्रांची निर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. स्पुटनिक लस प्रत्यक्ष जूनमध्ये, जॉन्सन अँड जॉन्सन व झायडस कॅडिला यांच्या लशी ऑगस्टमध्ये, नोव्हाव्हॅक्स सप्टेंबरमध्ये, नाकात टाकण्याची लस ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

 

लशींची परिणामकारकता

फायझर ९५ टक्के

मॉडर्ना  ९४ टक्के

स्पुटनिक ९२ टक्के

नोव्हाव्हॅक्स ८९ टक्के

अ‍ॅस्ट्राझेनेका ७० टक्के

जॉन्सन अँड जॉन्सन ६६ टक्के

सिनोव्हॅक- ५० टक्के